Mumbai Hit and Run Case: वरळी हिट अँड रन घटनेतील मृत महिलेला १० लाखांची मदत करा; काँग्रेस आमदाराची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 05:20 PM2024-07-09T17:20:11+5:302024-07-09T17:21:51+5:30
Worli Mumbai Hit and Run Case, Mihir Shah: सोमवारी पहाटे वरळीत मद्यधुंद अवस्थेत मिहीर शाह नावाच्या तरूणाने नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली.
Worli Mumbai Hit and Run Case: वरळीच्या अट्रिया मॉलजवळ घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला आज शाहपूरमधून अटक करण्यात आली. अपघातानंतर त्याने आपली कार वांद्रे, कलानगर परिसरात सोडली होती आणि वडील राजेश यांना फोन करून घटनाक्रम सांगितला होता. त्यानंतर मोबाईल बंद करून तो फरार झाला. अखेर मंगळवारी मिहीर शाहला शहापूरमधून अटक करण्यात आली. या दुर्घटनेत मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना तातडीने १० लाखांची मदत जाहीर करण्याची मागणी काँग्रेसचे मालाडचे आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली.
वरळी हिट अॅंड रन प्रकरणात मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना शासनातर्फे अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. एकीकडे शासन कोट्यवधी रुपये वाटत आहे. मात्र जे कोळी बांधव या मुंबईचे भूमिपुत्र आहेत, त्यांच्या घरातील महिलेचा अपघाती मृत्यू घडून २ दिवस झाल्यानंतरही सरकारकडू मदत मिळणार नसेल… pic.twitter.com/b520BoreSO
— Aslam Shaikh, INC 🇮🇳 (@AslamShaikh_MLA) July 9, 2024
मंगळवारी सभागृहात बोलताना अस्लम शेख यांनी ही मागणी केली. "रविवारी वरळीतील अॅट्रीया मॉल परिसरात पहाटे साडेपाच वाजता हिट अँड रन ची घटना घडली होती. या अपघातात मासे आणण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला भरधाव चारचाकीने उडवले. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेच्या कुटुंबीयांना शासनातर्फे अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. एकीकडे शासन कोट्यवधी रुपये वाटत आहे. मात्र जे कोळी बांधव या मुंबईचे भूमिपुत्र आहेत, त्यांच्या घरातील महिलेचा अपघाती मृत्यू घडून २ दिवस झाल्यानंतरही सरकारकडून मदत मिळणार नसेल, तर 'जनसामांन्यांचं सरकार' ही बिरुदावली मिरवण्याचा सरकारला अधिकार आहे का?" असा सवालही शेख यांनी उपस्थित केला.
या घटनेतील दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करुन मृत महिलेच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणीही शेख यांनी केली. दरम्यान, मिहीरने शनिवारी रात्री जुहू येथील एका बारमध्ये मित्रांसह मद्यप्राशन केले. त्यांचे बिल १८ हजार ७३० रुपये झाले. ते त्याच्या मित्राने भरले. रात्री दीडच्या सुमारास ते बारमधून बाहेर पडले. त्यानंतर तो गोरेगावला घरी गेला. त्याने आपल्या कारचालकाला लाँग ड्राइव्हला जायचे असल्याचे सांगितले. कार घेऊन तो पुन्हा मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावच्या दिशेने निघाला. गोरेगावला जाताना मिहीर स्वतः गाडी चालवत होता. त्याचवेळी त्याने वरळीत नाखवा दाम्पत्याला धडक दिली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर पतीला दुखापत झाली.