उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेला भाजपचा १00 टक्के पाठिंबा; काँग्रेसची मदार राष्ट्रवादीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 02:55 AM2019-04-22T02:55:06+5:302019-04-22T02:56:08+5:30

घरोघरी, चाळी, झोपडपट्टीमध्ये प्रचार आणि प्रसाराला वेग

100 percent support for BJP in Shiv Sena in north-west Mumbai; NCP leader | उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेला भाजपचा १00 टक्के पाठिंबा; काँग्रेसची मदार राष्ट्रवादीवर

उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेला भाजपचा १00 टक्के पाठिंबा; काँग्रेसची मदार राष्ट्रवादीवर

Next

- मनोहर कुंभेजकर 

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांना भाजपाने 100 टक्के पाठिंबा दिला आहे. शिवाय आरपीआय (आठवले गट) व रासपाचाही पाठिंबा मिळत आहे. काँगेसचे उमेदवार संजय निरुपम यांचे मनसेचे हाडवैर आहे, तर मोदी व अमित शाह मुक्त भारत ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका आहे. त्यामुळे मनसैनिक ना निरुपम व ना महायुतीला मतदान करतील, तर मतदानाचा हक्क बजावत मनसैनिक मोठ्या प्रमाणात नोटा मतदान करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीतील महायुती व काँग्रेस आघाडी यांच्या प्रचाराकडे मुंबईसह देशाचे लक्ष लागले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कीर्तिकर यांनी दिवंगत माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचा १,८३,०२८ मतांनी पराभव केला होता. कीर्तिकर यांचा प्रचार व प्रसार जशी आता निवडणुक जवळ येऊ लागल्यावर तसा जोर वाढू लागला आहे. या मतदार संघातील जोगेश्वरी (पूर्व), दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम व अंधेरी (पूर्व) या सहा विधानसभा मतदार संघात गेल्या ६ एप्रिल गुढीपाडव्यापासून आज पर्यंत प्रचाराचा दुसरा टप्पा देखिल पूर्ण केला आहे. सकाळी १० ते १ व सायंकाळी ५ ते ९ प्रचार फेरी व चौक सभा, दुपारी भोजन, थोडा आराम असा त्यांचा गेली १५ दिवस दिनक्रम सुरू आहे. कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी शिवसेनाभाजपा ४२ प्रभागांमध्ये स्वतंत्र प्रचार करत असून घरोघरी, झोपडपट्टीत जाऊन महायुतीचे कार्यकर्ते मतदार संघ पिंजून काढत आहे. उद्योग मंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी गेल्या सलग दोन रविवारी गोरेगाव पश्चिम व गोरेगाव पूर्व येथे कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी काढलेल्या सायकल फेरीला देखिल उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर गेल्या १६ एप्रिलला गोरेगाव पूर्व बांगुर नगर येथे धिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहिर सभेला सुमारे २५ हजार नागरिक उपस्थित होते.

प्रचार सभा, चौक सभा, जाहिर सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका यांच्यासह रिक्षा चालक, घर काम करत असलेल्या महिला, युवकांसाठी संमेलन अशी निरुपम यांचा व्यस्त प्रचार व प्रसार यंत्रणा प्रणाली आहे. आणि त्यांच्या प्रचाराचा जोर वाढत आहे. राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व सचिव नरेंद्र वर्मा, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अजित रावराणे व त्यांचे कार्यकर्ते निरुपम यांच्या प्रचारात हिरीरीने भाग घेत असल्याचे चित्र आहे.

विद्या ठाकूर, अमित साटम, भारती लव्हेकर, सरिता राजपूरे, जयप्रकाश ठाकूर, दिलीप पटेल व 21 नगरसेवक माझा प्रचार करत आहेत. महायुतीचे (आठवले गट ) व रासपाचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे मला प्रचारात बळ मिळत आहे.
- गजानन कीर्तिकर

नरेंद्र वर्मा, अजित रावराणे व कार्यकर्ते प्रचारात हिरीरीने भाग घेत आहेत. प्रचारात नागरिक सहभागी होत आहेत. महा आघाडीत प्रचारात ताळमेळ असून माझा प्रचार व्यवस्थित सुरू आहे. कार्यकर्त्यांची मजबूत फळी माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे. प्रचार व्यवस्थितरित्या सुरु आहे.
- संजय निरुपम

निरुपम यांनी केलेली कामे आणि विद्यमान खासदार यांचे निष्क्रिय काम यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ताकदीनिशी निरुपम यांच्या प्रचार मोहिमेमध्ये सहभागी होत आहेत.
- अजित रावराणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष

कीर्तिकर यांच्या प्रचाराला १०० टक्के पाठिंबा आहे. पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात मेहनत घेत आहेत. घरोघरी, चाळी, झोपडपट्टी येथे प्रचार करत
आहे.
- डॉ.भारती लव्हेकर,
भाजप आमदार, वर्सोवा

Web Title: 100 percent support for BJP in Shiv Sena in north-west Mumbai; NCP leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.