सर्वच मोठ्या पक्षांना मिळाली सरकारमध्ये राहण्याची संधी; अनेक कडू-गोड आठवणींनी गाजली १४ वी विधानसभा
By यदू जोशी | Published: July 13, 2024 07:28 AM2024-07-13T07:28:50+5:302024-07-13T07:29:13+5:30
दोन मोठे पक्ष फुटले, बदलातून सर्वांनी सत्तेची फळे चाखली
मुंबई : एकाच कार्यकाळात प्रमुख सहा पक्षांना सत्ता देणारी विधानसभा, एकाच कार्यकाळात दोन मोठ्या पक्षांच्या फुटीची साक्षीदार राहिलेली विधानसभा म्हणून १४ वी विधानसभा सदैव लक्षात राहील. चालू कार्यकाळातील शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले आणि गेल्या पाच वर्षांतील कडू-गोड आठवणींना उजाळा मिळाला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला निर्भेळ बहुमत मिळाले होते. साहजिकच या युतीचेच सरकार येणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, असे नक्की मानले जात असताना चमत्कार झाला. राजभवनवर सकाळी सकाळी एक शपथविधी झाला.
पहाटेचा शपथविधी...
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले; पण, त्यानंतर काहीच तासांमध्ये अजित पवार माघारी फिरले. शरद पवार यांनी नंतरच्या चमत्कारात मोठी भूमिका निभावली.
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, त्यात अर्थातच मोठ्या पवारांची भूमिका महत्त्वाची होती.
काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार नाही, असे प्रत्येकाला वाटत असताना सोनिया गांधी यांनी परवानगी दिली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापण्याचा मार्ग मोकळा झाला.
सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपवर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले.
पुतण्याचा धक्का
जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले आणि ते महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह अजित पवार गटाचे नऊ जण मंत्री झाले. शरद पवार यांच्या वर्चस्वाला पुतण्याने जबर धक्का दिला.
सहा पक्षांना सत्तेची फळे
पाच वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांमध्ये उभी फूट पडली. भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट, राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि काँग्रेस अशा सहा मोठ्या पक्षांना आलटून-पालटून सत्ता मिळाली. सत्तांतर, पक्षफुटीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही पक्षांमधील फुटीवर दिलेल्या निर्णयांवरही उलटसुलट चर्चा झाली.
असे बदलत गेले राजकीय समीकरण...
या विधानसभेचा दुसरा टर्निग पॉइंट ठरली ती जून २०२२ मध्ये झालेली विधान परिषद आणि राज्यसभा निवडणूक. या निवडणुकांनी राज्याचे राजकीय समीकरण बदलले. ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असलेले एकनाथ शिंदे यांनी बंड करत समर्थक आमदारांसह आधी सुरत मग गुवाहाटीमार्गे गोवा गाठले आणि नंतर ते मुंबईत परतले.
आता पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार येणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, असे मानले जात असतानाच पुन्हा चमत्कार झाला. राजभवनवर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी जाहीर केले की, एकनाथ शिंदे हे नवीन मुख्यमंत्री असतील, मी स्वत: सरकारमध्ये नसेन. फडणवीस यांच्या या विधानानंतर एकच खळबळ माजली.
भाजपच्या अनेक आमदारांनी फडणवीसांनी सरकारमध्ये राहावे, असा आग्रह धरला. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर वेगवान हालचाली घडल्या. तेवढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला. ते फडणवीस यांना असे म्हणाले, की “तुम्हाला सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हायचे आहे, मी आपला नेता आहे आणि हा माझा आदेशच समजा.” त्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
विद्यमान विधानसभेला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निरोप देताना हा घटनाक्रम अनेकांना आठवला. अनेक सदस्यांच्या भावना दाटून आल्या. पुढच्या वेळी निवडून येण्याचा विश्वास बाळगत आणि ईश्वराकडे त्यासाठी मनोमन प्रार्थना करीत त्यांनी सभागृहाचा निरोप घेतला.