"काँग्रेस सत्तेत आल्यावर महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण; महाराष्ट्रातून सुरुवात होणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 06:20 PM2024-01-25T18:20:43+5:302024-01-25T18:21:53+5:30

आता विधानसभा व लोकसभेतही महिलांचे प्रतिनिधित्व वाढले पाहिजे यावर महिला काँग्रेसचा भर आहे. महिला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी भाजपाला १० वर्षे लागली पण तेही अर्धवटच आहे अशी टीका त्यांनी केली. 

"33 percent political reservation for women after coming to power; to start from Maharashtra" - Alka Lamba | "काँग्रेस सत्तेत आल्यावर महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण; महाराष्ट्रातून सुरुवात होणार"

"काँग्रेस सत्तेत आल्यावर महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण; महाराष्ट्रातून सुरुवात होणार"

मुंबई - दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने पंचायत राजमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन राजकारणातील महिलांचा सहभाग वाढवला आहे. महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवण्याचा काँग्रेस पक्षाचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये ४० टक्के महिलांना उमेदवारी देऊन काँग्रेसने एक ऐतिहासिक पाऊल उचलले होते. महिला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारला १० वर्षे लागली तरीही अद्याप त्याची अंमलबाजवणी मात्र केलेली नाही. काँग्रेसची सत्ता आली तर महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण लागू केले जाईल. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होईल असा विश्वास महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी व्यक्त केला आहे.

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा या तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अलका लांबा यांनी यावेळी टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्या पुढे म्हणाल्या की, महिला काँग्रेस संघटन मजबूत करणे, भारत जोडो न्याय यात्रा व आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात या तीन दिवसात सविस्तर चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यावर महिला काँग्रेसचा भर आहे. महिला सशक्तीकरणावर काँग्रेस पक्षाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. पंचायत राजमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन महिलांचे प्रतिनिधित्व वाढले आहे. आता विधानसभा व लोकसभेतही महिलांचे प्रतिनिधित्व वाढले पाहिजे यावर महिला काँग्रेसचा भर आहे. महिला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी भाजपाला १० वर्षे लागली पण तेही अर्धवटच आहे अशी टीका त्यांनी केली. 

तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देणाऱ्या भाजपाच्या राज्यातच महिला अत्याचारी मोकाट आहेत. महिला खेळाडूंवर लैंगिक अत्याचार कऱणारा भाजपाचा खासदार ब्रजभूषण शरण सिंह अजूनही मोकाटच आहे. गुन्हा दाखल होऊन ६ महिने झाले तरी कारवाई मात्र झालेली नाही. पंतप्रधानांचा मतदारसंघ वाराणसीमध्ये एका विद्यार्थ्यीनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला, यातील गुन्हेगार भाजपाशी संबंधित आहेत. या गुन्हेगारांनी मध्य प्रदेशात भाजपाच्या प्रचारातही सहभाग घेतला, जनतेचा तीव्र आक्रोश बघून नंतर कारवाई करण्यात आली. गुजरातमध्ये बिल्कीस बानोवर सामुहिक बलात्कार करुन हत्याकांड करणाऱ्या ११ दोषींना शिक्षेतून मुक्त करण्याचे काम भाजपा सरकारने केले होते सर्वोच्च न्यायालयाने या ११ जणांना मुक्त करण्याचा निर्णय रद्द करत पुन्हा जेलमध्ये रवानगी केली. महिला अत्याचार करणाऱ्या राम रहिम बाबाला हरियाणा सरकारने ९ वेळा पॅरोलवर मुक्त केले आहे. संदीप सैनी या भाजपाशी संबंधित व्यक्तीवरही महिला अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल आहे पण कारवाई होत नाही असा आरोपही अलका लांबा यांनी केला. 

दरम्यान, मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर सामुहिक अत्याचार करण्यात आले. मणिपूर ८ महिन्यांपासून जळत आहे पण पंतप्रधान मणिपूरवर बोलत नाहीत व मणिपूरला जातही नाहीत. भाजपाच्या राज्यात मागील दोन वर्षात देशभरातून तब्बल १० लाख महिला बेपत्ता झाल्या आहेत आणि त्यात महाराष्ट्र व मध्य प्रदेशातून सर्वात जास्त महिला बेपत्ता आहेत. या महिला गेल्या कुठे? हा गंभीर प्रश्न आहे. भाजपा सरकारमध्ये महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. खासदार राहुल गांधी यांनी मणिपूर येथून भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली असून या यात्रेचा समारोप मुंबईत होत आहे. या न्याय यात्रेत नारीशक्तीला न्याय देण्याचाही अंतर्भाव आहे. ज्या महिलांवर अन्याय अत्याचार झाला त्यांना या यात्रेत सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा ही ऐतिहासिक आहे. या यात्रेला ईशान्य भारतात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे म्हणूनच आसामचे भाजपा सरकार बिथरले आहे. यातूनच यात्रेवर हल्ले करण्याचे प्रकार झाले पण यात्रा मात्र सुरुच आहे व सुरुच राहिल असेही अलका लांबा म्हणाल्या.  

Web Title: "33 percent political reservation for women after coming to power; to start from Maharashtra" - Alka Lamba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.