लोकसभेआधी मोठं खिंडार पडणार, काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या संपर्कात'; 'या' नेत्याचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 01:51 PM2024-01-15T13:51:20+5:302024-01-15T13:53:05+5:30
येणाऱ्या लोकसभेच्या अगोदर काँग्रेसमध्ये मोठं खिंडार पडणार आहे, काँग्रेस हा पक्ष संपल्यात जमा असणारा पक्ष होणार आहे.
BJP ( Marathi News ) मुंबई- येणाऱ्या लोकसभेच्या अगोदर काँग्रेसमध्ये मोठं खिंडार पडणार आहे, काँग्रेस हा पक्ष संपल्यात जमा असणारा पक्ष होणार आहे. काँग्रेस मधील दोन माजी राज्यमंत्री, दोन माजी अध्यक्ष काँग्रेसला रामराम करतील, ते भाजपच्या संपर्कात आहेत, असा मोठा गौप्यस्फोट भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला. दरम्यान, या गौप्यस्फोटोने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
काल मुंबईतील काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम करत शिंदे शिवसेनेल गटात प्रवेश केला. यामुळे आता आणखी काही नेते काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भाजप नेते आशिष देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लोकसभेआधी काँग्रेसमध्ये मोठं खिंडार पडणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
आशेवर राहू नका, मुंबईला जायचे म्हणजे जायचे; बच्चू कडू यांच्या भेटीनंतरही जरांगे पाटील ठाम
'लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे खिंडार पडलेले असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठिंबा देण्यासाठी अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. हे सर्व नेते भाजपमध्ये येत असतील तर नक्कीच भाजपचे चांगले काम सुरू आहे, चांगले काम करणारी लोक काँग्रेसला चालत नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस संपलेली असेल, असंही भाजप नेते आशिष देशमुख म्हणाले.
काँग्रेसशी गेल्या ५५ वर्षांपासूनचे संबंध संपले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू करण्यापूर्वीच रविवारी(दि.14) दोन झटके बसले. आधी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milin Deora) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता असाममधील नेते अपूर्वा भट्टाचार्य (Apurba Bhattacharya) यांनीही काँग्रेसला राम-राम ठोकला. राहुल गांधींच्या यात्रेपूर्वी दोन नेत्यांचा राजीनामा पक्षासाठी मोठे नुकसान मानले जात आहे.
राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्र आणि आसाममधून
दरम्यान, आसाममध्ये काँग्रेस पक्षाला सातत्याने धक्के बसत आहेत. अनेक बडे नेते पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये असाम काँग्रेसच्या दोन प्रमुख नेत्यांनी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला होता. राजीनामा दिलेल्या दोन नेत्यांमध्ये नाजावचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बोरा आणि असाम प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष पोरीटुष रॉय यांचा समावेश आहे. त्यानंतर आज काँग्रेसचे सचिव अपूर्व भट्टाचार्य यांनी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधींची यात्राही महाराष्ट्र आणि आसाममधून जाणार आहे.