"मूल हे परमेश्वर किंवा अल्लाची कृपा नसते, तर नवरा बायकोची कृपा असते"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 08:40 PM2023-04-21T20:40:18+5:302023-04-21T20:55:37+5:30
लोकसंख्येच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार यांनी केंद्र सरकारला अप्रत्यक्षपणे काही सूचना केल्या आहेत
मुंबई- राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच चर्चेत आहेत. त्यातच, कोण संजय राऊत? असा प्रश्न विचारत पुन्हा एकदा अजित पवारांनी आपला बाणा दाखवून दिला. त्यामुळे, अजित पवार यांची भूमिका आणि त्यांच्या विधानांवर सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच, गेल्या दोन दिवसांत भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. भारताने चीनला लोकसंख्येत मागे टाकल्याचे वृत्त मीडियात झळकले. अजित पवार यांनी एका मुलाखतीत बोलताना देशाच्या लोकसंख्येसंदर्भातही परखडपणे भाष्य केलं.
लोकसंख्येच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार यांनी केंद्र सरकारला अप्रत्यक्षपणे काही सूचना केल्या आहेत. तसेच, मूल जन्माला घालणं हे देवाचं किंवा अल्लाची कृपा नसून ती नवरा-बायकोची कृपा असते, असे अजित पवार यांनी म्हटले. यावेळी, उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. लोकसंख्येच्या बाबतीत आपण चीनला मागे टाकलं आहे. १९४७ साली भारताची लोकसंख्या ३२-३५ कोटी होती. आता २०२३मध्ये जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या निर्माण करणारा भारत देश असा आपला नावलौकीक झाला आहे. त्यामुळे, आता कठोर निर्णय घेतले गेले पाहिजेत. किती अपत्य जन्माला घालावीत हे कोणत्याही जातीत, धर्मात किंवा पंथात सांगितलेलं नाही, असे परखड मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
मुल जन्माला घालणं ही परमेश्वर किंवा अल्लाची कृपा नसते, ती नवरा-बायकोची कृपा असते. हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाकली पाहिजे. मुलीलाही तेवढाच अधिकार आणि मानसन्मान दिला पाहिजे. दोन्ही मुली झाल्या तरी काही बिघडत नाही. लेकच बापाचं नाव काढते. मुलगा नाव काढत नाही, उलट मुलगा नाव घालवतो, असेही अजित पवार यांनी म्हटले.
संजय गांधींचाही दिला दाखला
अजित पवार यांनी या प्रश्नावर बोलताना दिवंगत नेते संजय गांधी यांचा दाखला दिला. संजय गांधी आता नाहीत, पण १९७५ सालातील कार्यक्रम खऱ्या अर्थाने राबवला गेला असता. तर, आज लोकसंख्येमुळे आपल्याला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं, ते कमी झालं असतं. सगळ्यात जास्त तरुणांची संख्या असलेला देश आहे. पण, तरुणांची संख्या किती असावी, यावर मर्यादा पाहिजे. त्यामुळे पुढच्या पिढीचं नुकसान होता कामा नये. याबाबत आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करुन कठोर निर्णय घेतला गेला पाहिजे, असं परखड मत अजित पवार यांनी या मुलाखतीत व्यक्त केलं.