कार्यकर्ते प्रचारात सक्रिय नसल्याचे चित्र; अनिल देसाईंच्या प्रचारात काँग्रेस बॅकफूटवर? 

By मनोज गडनीस | Published: April 17, 2024 08:15 AM2024-04-17T08:15:55+5:302024-04-17T08:16:18+5:30

मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात उद्धवसेनेतर्फे अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर होऊन काही ...

A picture of activists not being active in campaigning Congress on the back foot in Anil Desai's campaign? | कार्यकर्ते प्रचारात सक्रिय नसल्याचे चित्र; अनिल देसाईंच्या प्रचारात काँग्रेस बॅकफूटवर? 

कार्यकर्ते प्रचारात सक्रिय नसल्याचे चित्र; अनिल देसाईंच्या प्रचारात काँग्रेस बॅकफूटवर? 

मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
: मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघात उद्धवसेनेतर्फे अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर होऊन काही दिवस उलटले असले, तरी अद्यापही महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देसाई यांच्या प्रचारासाठी हात आखडता घेतला असल्याचे चित्र आहे. या लोकसभा मतदारसंघातून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व धारावीच्या काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांना रस आहे.

अध्यक्षांनी आदेश दिल्यानंतरच आम्ही प्रचाराला लागू, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे तूर्तास तरी अनिल देसाई स्वपक्षीय कार्यकर्त्यांसोबतच प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे २००४ व २००९ मधून खासदार म्हणून निवडून आले होते. 

मात्र, त्यानंतर शिवसेना व भाजप युतीचे राहुल शेवाळे २०१४ व २०१९ मध्ये येथून खासदार झाले. यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेनेच्या विभाजनापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतले समजल्या जाणाऱ्या राहुल शेवाळे यांच्यासमोर आता उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतले अनिल देसाई उभे ठाकले आहेत. मात्र, या दोन्ही शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर मत विभाजन होण्याचे संकेत आहेत. 

बहुजन समाजाची मोठी मते 
या लोकसभा मतदारसंघात धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, चेंबूरमधील काही भाग येथून एकगठ्ठा मतदान होते. या चारही विधानसभा मतदारसंघांत बहुजन समाजाची मतांची टक्केवारी लक्षणीय आहे. त्यामुळे येथून यंदाची राजकीय स्थिती पाहता काँग्रेसला तिकीट मिळाल्यास विजयाची शक्यता अधिक असल्याचे गणित वर्षा गायकवाड यांचे कार्यकर्ते मांडत आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची देखील त्यांची मागणी आहे. मात्र, अद्याप उद्धवसेना व काॅंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी यासंदर्भात कोणताही जाहीर भूमिका घेतली नसल्यामुळे अनिल देसाई यांची उमेदवारी कायम आहे. मात्र, त्यांच्या प्रचारात सहभागी न होता काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी दाखवण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.

Web Title: A picture of activists not being active in campaigning Congress on the back foot in Anil Desai's campaign?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.