पोलीस भरतीवेळी मृत्यूच्या दुर्घटना; अजित पवारांचा विधानसभेत आवाज, मांडली 'ही' सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 01:37 PM2023-03-03T13:37:55+5:302023-03-03T13:40:05+5:30

विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून पोलिस भरती केंद्रांवरच्या गैरसोयींचा मुद्दा उपस्थित केला.

Accidents of death during police recruitment; Ajit Pawar's voice in the Legislative Assembly, presented 'this' suggestion | पोलीस भरतीवेळी मृत्यूच्या दुर्घटना; अजित पवारांचा विधानसभेत आवाज, मांडली 'ही' सूचना

पोलीस भरतीवेळी मृत्यूच्या दुर्घटना; अजित पवारांचा विधानसभेत आवाज, मांडली 'ही' सूचना

googlenewsNext

मुंबई - पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांच्या निवास, भोजनाची सोय करावी. त्यांना स्वच्छतागृहे उपलब्ध करुन द्यावीत. महिला उमेदवारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी. धावण्याच्या चाचणीवेळी उमेदवारांना त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या टाळण्यासाठी धावण्याची चाचणी पहाटे 4 ते सकाळी 10 यावेळेत घ्यावी, आदी सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केल्या. 

विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून पोलिस भरती केंद्रांवरच्या गैरसोयींचा मुद्दा उपस्थित करताना अजित पवार म्हणाले की, मुंबईसह राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. भरती केंद्रांवर तरुण मोठ्या संख्येने येत आहेत. त्यांच्या निवास, भोजनाची गैरसोय होत असल्यानं, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी दूर केल्या पाहिजेत, असे म्हणत अजित पवार यांनी काही उदाहरणेही विधानसभेत दिली. 

पोलिस शिपाई भरतीसाठी, इंजिनियर, डॉक्टर, एमबीए, एमएस्सी झालेले तरुण येत आहेत. गावखेड्यातल्या शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची ही मुलं आहेत. उच्च शिक्षण घेऊनही नोकऱ्या नसल्यानं हे तरुण पोलिस भरतीसाठी येत आहेत. त्यांची काळजी घेणं ही आपली, शासनाची जबाबदारी आहे. मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये भरतीच्या वेळी, गणेश उगले या तरुणाला १६०० मीटर धावल्यानंतर चक्कर आली आणि तो कोसळला. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. तिथं त्याचा मृत्यू झाला. मुंबईत भरतीसाठी आलेल्या, अमर अशोक सोलंके या तरुणाला, तो राहत असलेल्या हॉटेलमध्ये, हार्ट अॅटॅक आला आणि हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे, असे पवार यांनी म्हटले. 

धावण्याची चाचणी पहाटे ४ ते सकाळी १० या वेळेत घ्या

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शासनाला विनंती केली की, भरती केंद्रांवर येणाऱ्या तरुणांची निवासाची सोय सभागृहात किंवा बंदिस्त ठिकाणी केली पाहिजे. आंघोळ व स्वच्छतागृहांची सोय असली पाहिजे. महिला उमेदवारांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली पाहिजे. वैद्यकीय उपचारांची सोय ठेवली पाहिजे. धावण्याची चाचणी आपण दुपारी भर उन्हात घेतो. माझी शासनला विनंती आहे की,  पोलिस भरतीसाठी आलेल्या तरुणांची धावण्याची चाचणी  पहाटे 4 ते सकाळी 10 या वेळेत घेण्यात यावी.  भरतीसाठी आलेल्या तरुणांपैकी ज्यांची निवड होईल किंवा ज्यांची होणार नाही, त्या सर्वांच्या मनात शासनाबद्दल एक चांगली भावना निर्माण करण्याचं काम आपण केलं पाहिजे, असंही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले..
 

Web Title: Accidents of death during police recruitment; Ajit Pawar's voice in the Legislative Assembly, presented 'this' suggestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.