आमच्या नियुक्त्या घटनेनुसार, त्यांच्या घटनाबाह्य; प्रफुल्ल पटेल यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 06:43 AM2023-07-08T06:43:32+5:302023-07-08T06:43:47+5:30
जयंत पाटील यांची नियुक्तीही अनधिकृत; दिल्लीत झालेली बैठक, त्यातील ठराव बेकायदा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खालच्या स्तरापासून वरिष्ठ स्तरापर्यंत संघटनात्मक झालेल्या सर्व नियुक्त्या या पक्षाच्या घटनेनुसार झाल्या नसल्याचा दावा अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी केला. शरद पवार यांनी गुरुवारी दिल्लीत बोलावलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठकही अधिकृत नव्हती, असा दावा करून आमच्या पक्षाची घटना आहे, त्याचे नियम आहेत. ती घटना निवडणूक आयोगाकडे दाखल केलेली आहे, असे पटेल यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथिगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी उपस्थित होते. मात्र, हे तिघे या पत्रकार परिषदेत एकही शब्द बोलले नाहीत.राष्ट्रवादीच्या घटनेत स्पष्ट लिहिलेले आहे की, पक्षाच्या ब्लॉक स्तरापासून वरच्या पदापर्यंत सर्व नियुक्त्या निवडणुकीद्वारे केल्या जातील. कुठल्याही पदावर थेट नियुक्त्या होणार नाहीत.
देशातील सर्व राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सप्टेंबर २०२२ मध्ये माझ्या स्वाक्षरीने झाल्या. यात राज्याचे प्रमुखही नियुक्त केले आहेत. मात्र, या नियुक्त्या पक्षाच्या घटनेनुसार नाहीत, निवडणुकीने ते निवडून गेलेले नाहीत. महाराष्ट्राच्या अध्यक्षाची नियुक्तीही अशीच माझ्या सहीने झालेली आहे. ती नियुक्तीही अधिकृत नाही. जयंत पाटील पक्षातून कुणाला काढू शकत नाहीत वा कोणाविरोधात अपात्रतेची याचिकाही दाखल करू शकत नाहीत, असे पटेल यांनी सांगितले.
मुळात जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत का?
जयंत पाटील यांनी नऊ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. मुळात जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत का? पक्षाच्या घटनेनुसार निवड झाली नसताना ते कशाच्या आधारे अपात्रतेची याचिका दाखल करू शकतात? संसदेत दाखल केलेल्या याचिकांबाबतही तशीच परिस्थिती असल्याचे पटेल म्हणाले.
आता विषय निवडणूक आयोगाकडे
महत्त्वाची बाब ही की, ३० तारखेलाच आम्ही आमदारांचे आणि अनेक नेत्यांच्या प्रतिज्ञापत्रांसह निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केल्याचेही पटेल यांनी सांगितले. आता हा विषय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष या दोघांच्या दारात पोहोचला असल्याचेही ते म्हणाले.राष्ट्रवादीत फूट नाही, तर सरळसरळ पक्षाचे बहुमत अजित पवार यांच्यामागे उभे आहे. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्षाचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात अजित पवारांना आहे हे निवडणूक आयोगाकडे ३० तारखेला दाखल केलेल्या याचिकेत आम्ही सांगितल्याचेही पटेल म्हणाले.
३० जूनच्या बैठकीत सर्व निर्णय
राष्ट्रवादीची ३० जून रोजी देवगिरीला एक महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीत राष्ट्रवादी पक्षाचे अनेक आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते
उपस्थित होते. त्या बैठकीत सर्वांनुमते अजित पवार यांना आपला नेता म्हणून निवडले आणि त्यापुढे अजित पवार यांनी मला म्हणजेच प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याचे पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर अजित पवार यांची विधिमंडळाचे नेते आणि अनिल पाटील विधानसभेतील प्रतोद म्हणून नियुक्त केल्याचे विधानसभा अध्यक्षांनी, तर अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत प्रतोद म्हणून नियुक्त केल्याचे सभापतींना मी कळविले, असे पटेल यांनी सांगितले.