राष्ट्रवादीची फौज निरुपम यांंच्या प्रचारात सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:52 AM2019-04-23T01:52:25+5:302019-04-23T01:53:20+5:30
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांनी महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.
मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांनी महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. निरुपम यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी गल्लीबोळ पिंजून काढत आहेत. १५ दिवस सुमारे २०० किमी पायी चालत घरोघरी तसेच मतदारसंघातील ७० टक्के झोपडपट्टीवासीयांशी संवाद साधला आहे. रथावर आरूढ होऊन सहा विधानसभा क्षेत्रांत रोड शो केला असून रात्री सभा असा त्यांच्या व्यस्त दिनक्रम सध्या सुरू आहे. यास राष्ट्रीवादीने सक्रिय पाठिंबा कसा दिला आहे? हे सांगत आहेत; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व राष्ट्रीय सचिव नरेंद्र वर्मा.
राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी केंद्रीय उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल हे २५ एप्रिल रोजी निरुपम यांच्या प्रचारासाठी जोगेश्वरी पश्चिम बेहराम बाग येथील गांधी शाळेजवळ सभा घेणार असून, राष्ट्रवादीने दिलेल्या १०० टक्के पाठिंब्याबाबत नरेंद्र वर्मा यांनी सांगितले की, २०१४ ते २०१९ ही ५ वर्षे वगळता हा मतदारसंघ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या ५ वर्षांत कीर्तिकर येथील १७ लाख मतदारांना दिसलेच नाहीत. मोदी लाटेत त्यांच्या गुरुदास कामत यांच्या विरोधात झालेला विजय म्हणजे त्यांना तर लागलेली लॉटरीच होती. येथील जनता आता आपला रोष मतदानातून व्यक्त करून निरुपम यांना विजयी करेल. या मतदारसंघातील ६,०६,३०० मराठी मतांचे विभाजन होऊन महाआघाडीला मानणारे मराठी बांधव आपली मते निरुपम यांना देतील. चुरशीच्या लढतीत निरुपम बाजी मारतील.
मोदी यांनी मतदारांना खोटी आश्वासने देऊन मोदी सरकार सत्तेवर आले. मोदी यांनी दिलेली कोणतीच आश्वासने पूर्ण केली नाहीत. शिवसेना व भाजप युतीने रस्ते, पाणी, गटारे, शौचालये या समस्या सोडविल्या नाहीत. मतदारसंघात झोपडपट्टी असून त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुटला नाही.