राहुलचं बायोपिक करण्याचं गमतीने म्हणालो - अभिनेता सुबोध भावे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 05:18 PM2019-04-08T17:18:07+5:302019-04-08T17:19:00+5:30
कार्यक्रम खेळता ठेवण्यासाठी गमंत म्हणून मी राहुल गांधी यांचा बायोपिक करायचा विषय काढला असं स्पष्टीकरण अभिनेता सुबोध भावे याने दिलं आहे
मुंबई - कार्यक्रम खेळता ठेवण्यासाठी गमंत म्हणून मी राहुल गांधी यांचा बायोपिक करायचा विषय काढला असं स्पष्टीकरण अभिनेता सुबोध भावे याने दिलं आहे. तसेच त्यांचं काम मी करूच शकतो कारण कोणाच्या तरी म्हणण्याप्रमाणे मी भारतरत्न ए. पी.जे.अब्दुल कलाम सर, सेरेना विल्यम्स यांच्या भूमिका करू शकतो तर राहुल गांधींची का नाही? असंही सांगत सुबोध भावे यांनी टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या पुण्यातील विद्यार्थी संवाद कार्यक्रमात सुबोधने राहुल गांधींचा बायोपिक करणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यावर सुबोधने फेसबुक पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.
फेसबूक पोस्टमध्ये सुबोध भावे म्हणतो की, मी रंगभूमीचा कलाकार आहे. रंगभूमी मला माणसाला समजून घ्यायला शिकवते, सर्वांशी आदरानी आणि प्रेमानी वागायला शिकवते. रंगभूमी कोणालाच अस्पृश्य समजत नाही आणि मी ही समजत नाही. माझे संस्कार मला माणसांमध्ये भेदाभेद शिकवत नाहीत असं त्याने सांगितले.
तसेच मी शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि मला त्याचा अभिमान आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर ही जबाबदारी देणाऱ्या उद्धव साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे आणि प्रेम आहे. आजपर्यंत मी मोहनजी भागवत, शरद पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, राज साहेब,रामदासजी आठवले या सर्वांना अतिशय प्रेमानी भेटलो आणि त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आदर आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांना ही त्यांची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने मी त्याच आदर आणि प्रेमानी भेटलो. त्यांना भेटून आनंद झाला.त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देखील अभिनेता सुबोध भावेंनी दिल्या.
पुण्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे यांनी केलं होतं. या मुलाखती दरम्यान अभिनेता सुबोध भावे आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात गमतीशीर किस्सा घडला होता.
एक अभिनेता म्हणून मी अनेकांचे बायोपिक केले आहे. लोकमान्य टिळकांच्या जीवनावरही बायोपिक केला आहे. मला अनेक लोकांनी सांगितले की, मी राहुल गांधी यांच्यासारखा दिसतो. मग मी विचार केला की, राहुल गांधी यांचा बायोपिक मी का करु नये? असं अभिनेता सुबोध यांनी राहुल गांधी यांना सांगताच राहुल गांधीनीही सुबोध, तू जसा माझ्यासारखा दिसतोस, तसाच मी पण तर तुझ्यासारखा दिसतो असं कौतुक अभिनेता सुबोध भावेचे केले. यानंतर सुबोध भावे याने सांगितलं की आपण एकमेकांवर बायोपिक करुया असं सांगितल्यावर उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला होता.