आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा; NCP निकालानंतर सांगितला 'EC' चा फुल फॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 12:26 PM2024-02-07T12:26:24+5:302024-02-07T12:27:51+5:30

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरच निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Aditya Thackeray Targets Election Commission; EC's full form told after NCP result | आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा; NCP निकालानंतर सांगितला 'EC' चा फुल फॉर्म

आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा; NCP निकालानंतर सांगितला 'EC' चा फुल फॉर्म

मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतही निवडणूक आयोगाने निर्णय दिला. आधी, बहुमताच्या जोरावर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाले होते. तर, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळाचे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्यात आले आहे. अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतला. या निर्णयानंतर विरोधी पक्षांतील नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनीही निवडणूक आयोगावर थेट टीका केली आहे.  

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरच निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यासंदर्भातील याचिकेवर काही चाचण्यांनंतर निर्णय घेतला. पक्षाच्या घटनेतील उद्दिष्टांची केलेली तपासणी, पक्षाची घटना, पक्षामध्ये संघटना तसेच विधिमंडळ पक्षपातळीवर नक्की कोणत्या गटाकडे बहुमत आहे, याची पडताळणी केल्याचे आयोगाने म्हटले. मात्र, आयोगाच्या निकालावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने तीव्र संताप व्यक्त केला. हा अदृश्य शक्तीचा निर्णय असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. तर, रोहित पवार यांनीही शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा फोटो शेअर करत निशाणा साधला आहे. जखमी वाघ अधिक धोकादायक असतो, असे रोहित यांनी ट्विट केले आहे.

आयोगाच्या निर्णयानंतर आता शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनीही निवडणूक आयोगावर टीका केली आहे. तसेच, निवडणूक आयोगाच्या EC चा फुलफॉर्म सांगत उपरोधात्मक टोलाही लगावला. ''इलेक्शन कमिशन खरोखर 'स्वतंत्र आणि निष्पक्ष' आहे का? पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं की, EC म्हणजे 'Entirely Compromised'! म्हणजेच तडजोड बहाद्दर!... असे म्हणत आदित्य ठाकरेंनी प्रखर शब्दात निशाणा साधला 

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे, असे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.


आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!
- अजित पवार, 
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

आयोगाने काय म्हटले?
पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. अजित पवारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस. ५ आमदार 
व एका खासदाराने दोन्ही बाजूंनी पत्र दिले.

शरद पवार यांच्यापुढे कोणते पर्याय?
निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे.
नव्या पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करणे.

आज दुपारपर्यंत पक्षाचे नाव सूचवा
आपल्या राजकीय गटाला कोणते नाव व चिन्ह द्यावे, यासाठी प्रस्ताव सादर करण्याची मुभा निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिली. बुधवारी दुपारपर्यंत शरद पवार गटाने तीन नावांचे पर्याय सादर करावे, असे आदेश आयोगाने दिले.
 

 

Web Title: Aditya Thackeray Targets Election Commission; EC's full form told after NCP result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.