भाजपानंतर शिंदे-अजितदादांचे उमेदवार ठरले; विधानपरिषदेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:47 IST2025-03-17T12:43:12+5:302025-03-17T12:47:29+5:30
Maharashtra Vidhan Parishad Election 2025: भाजपापाठोपाठ शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

भाजपानंतर शिंदे-अजितदादांचे उमेदवार ठरले; विधानपरिषदेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले?
Maharashtra Vidhan Parishad Election 2025: विधानपरिषदेवरील सदस्य हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या होत्या, त्या जागांवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. महायुतीत या पाच जागांपैकी तीन जागा भाजप, एक शिंदेसेना आणि एक अजित पवार गटाकडे आहे. विधानसभेचे आमदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. विरोधकांकडे विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसल्याने ते उमेदवार देण्याची शक्यता नाही. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून विरोधकांकडून रात्री उशीरापर्यंत उमेदवार जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे विधानपरिषदेची ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. भाजपानंतर आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट यांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहे.
विधानपरिषदेच्या या पाचही रिक्त जागांचा कार्यकाळ हा मे २०२६ पर्यंत आहे. त्यामुळे या जागेवर निवडून जाणाऱ्या सदस्यांना अवघ्या १३ महिन्यांची संधी मिळणार आहे. विधानपरिषदेतील पाच रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने रविवारी संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे या तिघांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने या तिघांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
विधानपरिषदेवर एकनाथ शिंदेंचा शिलेदार ठरला
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला विधानपरिषदेची एक जागा मिळाली होती. या जागेसाठी अनेक इच्छुक नावे पुढे आली होती.र या अनेक नावात आघाडीवर असलेल्या धुळे-नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेनेकडून माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांसह अनेकांची नावे उमेदवारीच्या शर्यतीत होती. परंतु, या सगळ्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव निश्चित करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधानपरिषेदवर कुणाला संधी?
भाजपा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने संजय खोडके यांना उमेदवारी घोषित केली आहे. संजय खोडके हे विदर्भातील पक्षाचे मोठे नेते असल्याचे सांगितले जात आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे जाहीर झालेले उमेदवार
भाजपा
- संदीप जोशी
- संजय केणेकर
- दादाराव केचे
शिवसेना शिंदे गट
- चंद्रकांत रघुवंशी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
- संजय खोडके