राष्ट्रवादीनंतर काँग्रेसचाही फिल्मी वार, रावसाहेब दानवेंना दिली 'या' व्हिलनची उपमा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 10:33 AM2020-10-08T10:33:50+5:302020-10-08T10:35:53+5:30
दानवेंच्या टीकेला उत्तर देताना अनिल देशमुखांनी ट्विट केले आहे की, महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो
मुंबई - शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे राज्यातील आघाडी सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनीचे सरकार आहे अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती, पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होत. या टीकेला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खास शैलीत उत्तर दिलं होतं. त्यानंतर, आता काँग्रेसनेही दानवेंच्या या टीकेला जशास तसे उत्तर दिलंय.
दानवेंच्या टीकेला उत्तर देताना अनिल देशमुखांनी ट्विट केले आहे की, महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण-होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी! अशा खास शैलीत देशमुख यांनी दानवेंचा समाचार घेतला होता. त्यानंतर, आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही दानवेंना जशात तसे उत्तर दिलंय. सावंत यांनी दानवेंना अमर-अकबर-अँथनी चित्रपटातील रॉबर्ट शेठची उमपा दिली आहे. काँग्रेसने दानवेंना व्हिलन ठरवलंय.
And all the three Amar, Akbar, Anthony will beat Robert Seth i.e @BJP4Maharashtra 😜 https://t.co/4n99ILdSy5
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 7, 2020
काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे राज्यातले आघाडी सरकार म्हणजे अमर अकबर अँथनीचे सरकार आहे, आम्हाला हे सरकार पाडायचं नाही, परंतु तेच एकमेकांच्या पायात पाय घालून पडले तर आम्ही तरी काय करणार असा टोला त्यांना महाविकास आघाडीला लगावला होता. केंद्राच्या शेती विधेयकांना महाराष्ट्रातच कोणताच विरोध नाही हे दिसत आहे, डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींचीच या विधेयकातून अंमलबजावणी झालेली आहे. खुद्द शरद पवार यांनीही विधेयकातील मुद्द्यांचा आग्रह धरला होता. त्यांचा तोच जुना व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चिला जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं, आम्हाला विरोधकांची भीती नाही पण त्यांच्या अपप्रचाराबाबत आम्ही स्पष्टीकरण नक्की देऊ असं दानवे म्हणाले.