सत्यजित तांबेंनंतर काँग्रेसकडून आणखी एकाचे निलंबन, तांबेना समर्थन भोवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 11:51 PM2023-01-25T23:51:27+5:302023-01-25T23:53:55+5:30
शुभांगी पाटील यांना शिवसेनेकडून अगोदरच पाठिंबा जाहीर करण्यात आला होता.
मुंबई/अहमदनगर - विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. यासंदर्भातील महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणाही झाली. त्यामध्ये, महाविकास आघाडीकडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. तर, सत्यजीत तांबेंवर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. 6 वर्षांसाठी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. आता, आणखी एका काँग्रेस नेत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सत्यजित तांबे यांना समर्थन दिल्यामुळे सुरशे साळुंके यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.
शुभांगी पाटील यांना शिवसेनेकडून अगोदरच पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार, त्यावर महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे की नाही हे ठरणार होते. अखेर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे अंबादास दानवे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली अन् नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी शुभांगी पाटील यांच्या नावावर तिन्ही पक्षाचे एकमत झाले. यासंदर्भात नाना पटोलेंनी जाहीरही केले. त्यासोबतच, सत्याजित तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मात्र, सत्यजित तांबेंच्या भूमिकेवरुन चांगलीच राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली.
सत्यजित तांबे यांनी आता प्रचार सुरू केला असून काँग्रेसचा मतदार आणि वडिलांनी केलेल्य कामाचा आधार आपल्यासोबत असल्याचा दावा ते करत आहेत. त्यातच, अहमदनगर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश साळुंखे यांनी सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्यासंदर्भात वर्ममानपत्रात बातमी छापली होती. ही बातमी आपण प्रसिद्ध केली की इतर कोणी याबाबत पक्षाने पत्रव्यवहार करुन २ दिवसांत खुलासा मागिवला होता. मात्र, ७ दिवस उलटूनही अद्याप खुलासा न मिळाल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरुन सुरेश सांळुखे यांना पुढील आदेश येईपर्यंत पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. यासंदर्भात काँग्रेस सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी त्यांना पत्र पाठवले आहे.
दरम्यान, सत्यजित तांबेंनंतर आता आणखी एका अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आला आहे.