"...म्हणून ते सतत पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलतात", सुप्रिया सुळेंनी सांगितलं फडणवीसांचं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 12:47 PM2023-06-30T12:47:55+5:302023-06-30T12:48:02+5:30

पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात सामना रंगला आहे.

 After Sharad Pawar, NCP leader Supriya Sule slammed Deputy Chief Minister Devendra Fadnavis over his swearing-in ceremony with Ajit Pawar  | "...म्हणून ते सतत पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलतात", सुप्रिया सुळेंनी सांगितलं फडणवीसांचं राजकारण

"...म्हणून ते सतत पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलतात", सुप्रिया सुळेंनी सांगितलं फडणवीसांचं राजकारण

googlenewsNext

मुंबई : पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात सामना रंगला आहे. फडणवीसांनी अलीकडेच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट करून शरद पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ज्याला पवारांनी देखील पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले असून याबाबत बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सातत्याने पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलत असल्याची टीका सुळेंनी केली.

सुप्रिया सुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होत्या. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, अजितदादांनी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर विशेष लेख लिहला आहे. राज्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कांद्याला, टोमॅटोला भाव आहे का? शेतकऱ्याच्या पदरात काहीही पडलेले नाही. पण यावर कोणीही बोलायला तयार नसून मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी मागील काळात घडलेल्या गोष्टींबद्दल भाष्य केले जात आहे. 
  
देवेंद्र फडणवीसांवर घणाघात 
"मागील ५५ वर्षे शरद पवार यांच्यावर शाब्दिक हल्ले होत आहेत, लोकशाहीत हे हल्ले महत्त्वाचे असतात. ज्या झाडाला फळ असते त्यालाच दगड मारली जाते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मूळ मुद्द्यांबद्दल बोलायचे नाही. म्हणूनच ते गॉसिप करत सातत्याने पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलत असतात. महिला सुरक्षेबद्दल ते काहीच का बोलत नाहीत? प्रशासनाचा कारभार सोडून हे सरकार सर्व विषयांवर बोलत आहे. मला गॉसिप करण्यासाठी वेळ नाही, पण फडणवीस अद्याप पहाटेच्या शपथविधीतच अडकलेले आहेत", अशा शब्दांत सुळेंनी फडणवीसांचा समाचार घेतला. 

शरद पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर 
गुरूवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावर भाष्य केले. "२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माझी भेट घेतली होती. त्यात सरकार स्थापन करण्यासाठी चर्चाही झाली होती. मात्र, दोन दिवसांनी मी भूमिका बदलल्याचे ते म्हणत आहेत. भेटीनंतर आणखी दोन दिवसांनी त्यांनी चोरून शपथ का घेतली", असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. तसेच शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचा त्यांना पाठिंबा होता तर मग सत्ता का गेली. सत्तेसाठी ते काही करायला तयार असतात आणि हे समाजासमोर यावे यासाठीच नंतरची खेळी खेळली असा गौप्यस्फोटही पवार यांनी यावेळी केला. त्यामुळे फडणवीस यांनी राजकीय वक्तव्य करण्याऐवजी राज्यातील कायदा सुव्यवस्थेकडे गांभीर्याने बघावे असा सल्लाही पवार यांनी दिला.

Web Title:  After Sharad Pawar, NCP leader Supriya Sule slammed Deputy Chief Minister Devendra Fadnavis over his swearing-in ceremony with Ajit Pawar 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.