चंद्रकांत हंडोरेंचा धक्कादायक पराभव; काहींनी गद्दारी केलीय, सत्य बाहेर येईल- भाई जगताप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 08:13 AM2022-06-21T08:13:47+5:302022-06-21T08:14:01+5:30
चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवानंतर काँग्रेसचे विजयी उमेदवार भाई जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई- राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत सर्वांत मोठा धक्का काँग्रेसला बसला. काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला.
काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे सेफ उमेदवार मानले जात होते. भाई जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांच्यात खरी लढत झाल्याचे सांगितले जात होती. मात्र, प्रत्यक्षात भाई जगताप यांचा विजय झाला आणि चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला. चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवानंतर काँग्रेसचे विजयी उमेदवार भाई जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विधान परिषद निवडणूकीत काहींनी गद्दारी केली आहे. ज्या कोणी लोकांनी पक्षासोबत गद्दारी केली, त्याबाबत निश्चित चर्चा होईल. सदर निकाल धक्कादायक आहे. काँग्रेसच्या मुख्य नेते असलेले चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवानं मला दु:ख झालं आहे. जे काही सत्य आहे, ते लवकरच समजेल. मी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटणार आहे. काँग्रेसचं दिल्लीत ईडीच्या विरोधात आंदोलन देखील आहे. त्यावेळी या पराभवाबाबत चर्चा होईल, अशी माहिती भाई जगताप यांनी दिली.
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंसह १३ आमदार 'नॉटरिचेबल'; उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, हालचालींना वेग https://t.co/q74rCgSLnH
— Lokmat (@lokmat) June 21, 2022
दरम्यान, विधान परिषदेचा निकाल पाहता काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांना मतांचा कोटा ठरवून दिला असताना प्रत्यक्षात मिळालेल्या मतांमध्ये फरक दिसला. काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पडली. हा निश्चितच गंभीर विषय आहे. याबद्दल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. हायकमांडला कळविले जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
सरकार म्हणून आता विचार करण्याची गरज
अडीच वर्ष सत्तेत राहूनही पक्षाची मतं फुटत असतील तर सरकार म्हणून आम्हाला विचार करण्याची गरज आता आहे. आपल्याच पक्षाची मतं जर फुटत असतील तर दुसऱ्यांना दोष देऊन काय उपयोग? इतरांना दोष देण्याचा मुद्दाच नाही. आम्हालाच आता विचार करण्याची गरज आहे. अडीच वर्ष सत्तेत राहूनही जर आमदारांमध्ये नाराजी असेल तर नेमकं कुठं चुकतंय याचा विचार करण्याची गरज आहे. नक्कीच आजच्या निकालाची माहिती पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवली जाईल, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी निकालानंतर दिली.