पुण्यातील घटनेनंतर अजित पवार संतापले, ताई-दादांचा गृहमंत्र्यांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 05:39 PM2023-06-27T17:39:47+5:302023-06-27T17:55:08+5:30
पुण्यातील सदाशिव पेठेत आज सकाळी दहा वाजण्याच्या पेरू गेट पोलीस चौकी पासून अवघ्या काही अंतरावर हा धक्कादायक प्रकार घडला
मुंबई - रायगडाच्या पायथ्याशी झालेलं दर्शना पवार हत्याप्रकरण ताजे असताना पुण्याच्या सदाशिव पेठेत तशीच धक्कादायक घटना घडली आहे. महाविद्यालयीन तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. तरुणाने हातात कोयता घेऊन तरुणीचा पाठलाग सुरू केला होता. तरुणापासून आपली जीव वाचवण्यासाठी ती तरुणी वाचवा... वाचवा... असा आक्रोश करुन भररस्त्यात धावत होती. त्याचवेळी, एक युवक जीवाची बाजी लावून पुढे सरसावली आणि आणखी एका तरुणाच्या मदतीने तरुणीचा जीव वाचला. या घटनेनं पुणे शहरासह महाराष्ट्र हादरला आहे. त्यावरुन, आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेत आज सकाळी दहा वाजण्याच्या पेरू गेट पोलीस चौकी पासून अवघ्या काही अंतरावर हा धक्कादायक प्रकार घडला. प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात तरुणी जखमी झाली असून तिच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेचा थरार आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सिनेस्टाईल थरारक घटनेत जखमी तरुणीसाठी दोन तरुणांनी जीवाची बाजी लावली. त्यामुळे, तरुणीचा जीव वाचला.
या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे, एकीकडे दिवसाढवळ्या ही घटना घडत असताना लोक केवळ बघ्याची भूमिका घेत होती. राजधानी दिल्लीतही काही दिवसांपूर्वी अशीच एका तरुणीची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे, विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात काय चाललंय, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही गृहमंत्र्यांना वेळ नाही का, असा सवाल विचारत घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांना बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही, अशा शब्दात अजित पवारांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच, या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो, असेही त्यांनी म्हटलं.
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 27, 2023
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
पुणे शहरात भररस्त्यात तरुणीच्या मागे कोयता घेऊन धावणाऱ्या तरुणाला अडवून त्या मुलीचे दोन धाडशी तरुणांनी प्रसंगावधान राखून प्राण वाचवले. या तरुणांनी दाखविलेले धाडस अतिशय कौतुकास्पद आहे. मुलीवर प्राणघातक हल्ला होत असताना आपल्या प्राणाची पर्वा केली नाही. त्यांचे याबद्दल हार्दिक अभिनंदन, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. तसेच, राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की, पुणे शहर व परिसरातील कोयता घेऊन हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, त्याला गुन्हेगारांचे नंदनवन बनवू नका, अशी मागणीही सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केलीय.