आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
By यदू जोशी | Published: September 20, 2024 07:27 AM2024-09-20T07:27:44+5:302024-09-20T07:28:04+5:30
अपवाद फक्त २०१४चा. त्यावेळी दोघे वेगळे लढले; पण भाजपला आजवरचे सर्वात मोठे यश तेव्हाच मिळाले.
यदू जोशी
मुंबई :काँग्रेस १९९९ पासून राष्ट्रवादीबरोबर आघाडीमध्ये लढत आहे. तेव्हापासून गेल्या २५ वर्षांत या पक्षाला ८२ पेक्षा अधिक जागा निवडून आणता आलेल्या नाहीत. याच पक्षाने १९७२च्या निवडणुकीत तब्बल २२२ जागा जिंकल्या होत्या. भाजप-शिवसेना यांची १९९० पासून निवडणूक युती झाली; अपवाद फक्त २०१४चा. त्यावेळी दोघे वेगळे लढले; पण भाजपला आजवरचे सर्वात मोठे यश तेव्हाच मिळाले.
काँग्रेस स्वबळावर शेवटची लढली ती १९९५ मध्ये. तेव्हा ८० जागा जिंकता आल्या. त्यानंतर लगेच म्हणजे १९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ७५ जागा मिळाल्या. तेव्हा शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होती. राष्ट्रवादीला तेव्हा ५८ जागा मिळाल्या आणि दोघांचे सरकार बनले. त्यानंतर २००४ मध्ये काँग्रेसला आघाडीत ६९ जागी यश मिळाले.
राष्ट्रवादीपेक्षा हा आकडा दोनने कमी होता. २००९च्या निवडणुकीत काँग्रेसने ८२ जागा जिंकल्या. २०१४ मध्ये काँग्रेस ४२ पर्यंत घसरली. हा आजवरचा नीचांकी आकडा राहिला. २०१९ मध्ये त्यात दोनने वाढ होऊन ४४ वर गेली.
अपक्षांचे संख्याबळ असे
१९९५ मध्ये आजवरच्या इतिहासात सर्वाधिक ४५ अपक्ष आमदार निवडून आले होते. त्यांनी तत्कालीन युती सरकारला पाठिंबा दिला होता.
आजवर अपक्षांनी जिंकलेल्या जागा अशा
१९६२ १५
१९६७ १६
१९७२ २३
१९७८ २८
१९८० १०
१९८५ २०
१९९० १३
१९९५ ४५
१९९९ १२
२००४ १९
२००९ २४
२०१४ ७
२०१९ १३
वेगळे लढूनही संख्याबळ वाढले
१९९० पासून २०१४चा अपवाद वगळता भाजप-शिवसेना युती होती. युती न करता लढूनही भाजपला सर्वात मोठे यश मिळाले. तेव्हा भाजपचे १२२ आमदार निवडून आले होते.
१९९० मध्ये भाजपने युतीमध्ये ४२ तर शिवसेनेने ५२ जागा जिंकल्या. १९९९ मध्ये शिवसेनेला ६९, भाजपला ५८ जागा मिळाल्या. २००४ मध्ये भाजप ५४, शिवसेना ६२, २००९ मध्ये भाजप ४६, शिवसेना ४४, असे चित्र होते. २०१४ मध्ये दोघे वेगळे लढले.
भाजपने १२२ तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आधी शिवसेना महिनाभर विरोधात बसली; नंतर सत्तेत आली. २०१९ मध्ये भाजपला १०५, शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या.