दिल्लीत अमित शाहांनी भेट नाकारली? अजित पवार म्हणाले, "आमचे जे खटले सुरु आहेत..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 04:27 PM2024-12-04T16:27:16+5:302024-12-04T16:33:51+5:30
दिल्ली दौऱ्यावरुन अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे.
Ajit Pawar : मंत्रीपदावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. महत्त्वाच्या मंत्रालयावर ताबा मिळवण्यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये स्पर्धा सुरु आहे. दरम्यान, महत्त्वाचे मंत्रिपद मिळावे यासाठी अजित पवार गेले दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर गेले असल्याचे म्हटलं जात होतं. गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेल्या अजित पवारांना अमित शहांना भेटू शकले नाहीत असं म्हटलं जात होतं. मात्र आता अजित पवार यांनी दिल्ली दौऱ्याबाबत खुलासा केला आहे.
अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याचा संबंध केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीशी जोडला जात होता. मात्र ही बैठक होऊ शकली नाहीत त्यामुळे दोन दिवसानी अजित पवार मुंबईत परतल्याचे म्हटलं. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हेही दिल्लीहून मुंबईत पोहोचले. दुसरीकडे, महायुतीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी माझ्या वेगळ्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो असं म्हटलं आहे.
"मी खुलासा करु इच्छितो की माझ्या वेगळ्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. मी कुणाला भेटालयला गेलो नव्हतो. त्यामुळे भेट नाकारण्याचा प्रश्न येतोच कुठे. माझी पत्नी सुनेत्रा पवार यांना सगळ्यांनी राज्यसभेवर सभासद केलं आहे. त्यांना ११ जनपथ हा बंगला मिळाला आहे. मला कुठलेही घर नीटनेटके लागतं. म्हणून मी आर्किटेकला घेऊन तिथे नियमात बसून काय गोष्टी करता येतील हे पाहण्यासाठी गेलो होतो. आपच्या पक्षाच्या संदर्भात ज्या केसेस सुरु आहेत त्यांच्या संदर्भात मी कधी वकिलांना भेटलो नव्हतो. दिल्लीची जबाबदारी प्रफुल्ल पटेल पार पाडत होते. आमचा विषय तिथं सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. इकडच्या व्यापामुळे मला वकिलांना भेटता आलं नव्हतं. त्यामुळे त्यांना भेटणे अतिशय गरजेचं होतं. आणखी जवळच्या नातेवाईकाचे लग्न होतं. अशा तीन गोष्टींसाठी मी दिल्लीला गेलो होतो. तिथं गेल्यानतंर इथल्यापेक्षा आराम मिळतो. त्यामुळे डोक्यातून काढून टाका की अमित शाहांना भेटायला गेलो होतो," असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मिळून महायुतीचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना तुम्ही फडणवीसांसोबत तुम्ही आणि अजित पवारही उपमुख्यमंत्री होणार आहात का? असं विचारलं. यावर एकनाथ शिंदे यांनी उद्या संध्याकाळी शपथविधी होणार आहे, त्याबाबत आज संध्याकाळपर्यंत कळेल असं म्हटलं. त्यावर अजित पवारांनी अडवून, मी मात्र शपथ घेणार आहे, एकनाथ शिंदेंना ठरवायचे आहे, असं म्हटलं.