काका, पुतण्याने शड्डू ठोकत उद्या बोलावली मुंबईत बैठक; आपलीच भूमिका योग्य असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 06:50 AM2023-07-04T06:50:51+5:302023-07-04T10:20:20+5:30

दोन्ही गटांच्या एकाच दिवशी बैठका

Ajit Pawar And Sharad Pawar calling a meeting in Mumbai tomorrow; Claiming that your own position is correct | काका, पुतण्याने शड्डू ठोकत उद्या बोलावली मुंबईत बैठक; आपलीच भूमिका योग्य असल्याचा दावा

काका, पुतण्याने शड्डू ठोकत उद्या बोलावली मुंबईत बैठक; आपलीच भूमिका योग्य असल्याचा दावा

googlenewsNext

मुंबई : शरद पवारांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची ५ जुलै रोजी बैठक बोलावली असून, अजित पवार गटानेही ५ जुलै रोजीच वांद्रे येथील एमईटी संस्थेत पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी यांना बोलावण्यात आले असून, राज्यभरातून राष्ट्रवादीतील पदाधिकारी उपस्थित राहतील, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांनी मला कालच प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्तीचे पत्र दिल्याचे सांगत लवकरच पक्षाच्या अन्य नियुक्त्या केल्या जातील असे त्यांनी सांगितले.

पवारांचा आशीर्वाद
आमची शरद पवारांना हात जोडून विनंती आहे बहुसंख्य आमदार, वरिष्ठ नेते, सामान्य कार्यकर्त्यांच्या इच्छेचा त्यांनी आदर करावा. त्यांचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहावा, अशी भूमिका पटेल यांनी मांडली. पवार आमचे गुरु आहेत, या कामाला त्यांचा आशीर्वाद असल्याचे भुजबळ म्हणाले.

राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच
एवढ्या सगळ्या नियुक्त्या जाहीर केल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत हे तुम्ही विसरलात का? असा प्रतिसवाल अजित पवार यांनी विचारला.

अजित पवारांची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका
आम्ही कायदेशीर लढाई न लढता जनतेत जाऊ, असे शरद पवार म्हणाले होते. त्यावर नाव न घेता टीका करताना अजित पवार म्हणाले की, आम्ही न्यायालयात न जाता जनतेत जाऊ असे काही लोक काल म्हणाले होते; पण रात्री १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन वेगळ्या घटना सांगितल्या जात आहेत; मात्र त्या सगळ्याला अर्थ नाही. आम्ही घेतलेली भूमिका योग्य असून राज्याच्या आणि राष्ट्रवादीच्या भल्याची आहे.

पक्ष कुणाकडे आयोग ठरवणार
पक्ष कुणाकडे आहे, चिन्ह कुणाकडे आहे हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. आम्हीच पक्ष आहोत, बहुसंख्य आमदार आमच्याबरोबर आहेत. कुणाला हे बंड वाटते, पण तुम्हाला वाटून काही चालत नाही. उद्या वाद निर्माण झाला तर आयोगाने दिलेला निर्णय अंतिम असतो, हे तुम्ही अलीकडेच पाहिले आहे, असेही अजित पवार आणि पटेल म्हणाले. 

सुप्रिया सुळेंबाबत काय भूमिका?
सुप्रिया सुळेंची हकालपट्टी करणार का, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, आम्ही बेरजेचे राजकारण करतो आहे, इथे हकालपट्टी करायला बसलो नाही.

पटेल-भुजबळ यांचेही पवारांना चॅलेंज

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा शरद पवार यांनी रविवारी दिला होता. त्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, पटेल आणि तटकरेंची नेमणूक पक्षाच्या कार्यकारिणीने केली आहे.कार्यकारिणीने घेतलेला निर्णय, असा बदलता येत नाही. नियमानुसार प्रफुल्ल पटेल हे अजूनही काम करू शकतात. आमच्यावर कारवाई करण्याचा पवारांनी घेतलेला निर्णय लागू होत नाही. आमच्या पक्षाच्या बहुसंख्य लोकांनी आमच्या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे. लोकशाहीत बहुमताने घेतलेला निर्णय वैध आहे, तो कोणी बदलू शकत नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. कुठलाही वाद होऊ नये अशी आमची इच्छा असून त्यासाठी मनापासून प्रयत्न करणार. आमच्याकडे आमदार आहेत म्हणून शपथविधी झाला. आम्ही पक्ष आहोत म्हणून आम्ही संख्या सांगत नाही, जे पक्षावर दावा करत आहेत, त्यांनी सांगावे त्यांच्याकडे किती आमदार आहेत? असेही 
पटेल म्हणाले.

Web Title: Ajit Pawar And Sharad Pawar calling a meeting in Mumbai tomorrow; Claiming that your own position is correct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.