"अजित पवार बारामतीचे अरुण गवळी झालेत"; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 01:37 PM2024-04-09T13:37:22+5:302024-04-09T13:39:32+5:30
बारामती मतदारसंघातही नागरिकांना धमकावण्याचे उद्योग सुरू आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खा. खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी येथे केला.
मुंबई - महाविकास आघाडीचं नुकतेच जागावाटप जाहीर करण्यात आले असून सांगलीतील जागा शिवसेना उबाठा पक्षाला देण्यात आली आहे. त्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून मविआमध्ये सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आता महायुतीमधील उरलेल्या अंतिम जागांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात राजकीय धुरळा उडायला आता सुरुवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून महत्त्वाच्या मतदारसंघात बडे नेते स्वत:हून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील राजकीय लढत आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळेंच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले असून अजित पवारांकडून बारामतीमध्ये दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे.
बारामती मतदारसंघातही नागरिकांना धमकावण्याचे उद्योग सुरू आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खा. खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी येथे केला. त्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. बारामतीमध्ये अजित पवारांकडून धमकावण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. फोन करुन दमदाटी केली जाते, बदली करुन टाकतात. अरुण गवळी जसं निवडणुकीला करत होता. तसं, अजित पवार बारामतीचे अरुण गवळी झाले आहेत, अशा शब्दात आमदार आव्हाड यांनी अजित पवारांना लक्ष्य केले.
तसेच, बारामतीची ओळख ही शरद पवारांमुळे आहे. बिल क्लिंटन बारामतीत अजित पवारांमुळे आले नव्हते, नरेंद्र मोदी हेही अजित पवारांमुळे बारामतीत आले नव्हते, ते शरद पवारांमुळेच आले होते. त्यामुळे, बारामतीची जनता शरद पवारांच्या पाठिशी आहे, सुप्रिया सुळेंच्यासोबत आहे. म्हणून, बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे २ लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी होणार, असे भाकीतही आव्हाड यांनी केले आहे.
आम्ही कोणाला घाबरणार नाही - सुळे
बारामतीची स्वाभिमानी जनता धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही कोणाला घाबरत नाही व गप्पही बसणार नाही. हा महाराष्ट्र सूडाचे राजकारण खपवून घेणार नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. नवी मुंबईमधील कोपरखैरणे येथे भोर, पुरंदर, मुळशी तालुक्यातील रहिवाशांचा मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये सुळे यांनी भाजपसह महायुतीवर टीकेची झोड उठविली. जे गेले त्यांना शुभेच्छा. त्यांच्याविषयी काही बोलणार नाही. आम्ही रडणार नाही लढणार, नव्या ताकदीने उभे राहणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.