हिंमत असेल तर अविश्वास आणाच! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विरोधी पक्षाला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 05:25 AM2021-12-22T05:25:36+5:302021-12-22T05:26:24+5:30

विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून गाजणार

ajit pawar challenge to the opposition if you have courage bring disbelief | हिंमत असेल तर अविश्वास आणाच! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विरोधी पक्षाला आव्हान

हिंमत असेल तर अविश्वास आणाच! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विरोधी पक्षाला आव्हान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून मुंबईत सुरू होत असून अनेक मुद्दयांवर आक्रमक झालेला विरोधी पक्ष सरकारची कोंडी करणार असे दिसत असतानाच हिंमत असेल तर अविश्वास ठराव आणून सरकार पाडून दाखवा, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्ष भाजपला दिले आहे, तर लोकशाही गुंडाळून ठेवलेले हे सरकार ‘रोक’शाहीचे अन् ‘रोख’शाहीचे आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

ओबीसी आरक्षण, सरकारी नोकर भरतीतील पेपरफूट, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तोकडी मदत, एसटी कर्मचाऱ्यांचा संप आदी मुद्दयांवर सरकारला घेरण्याची तयारी भाजपने केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधी पक्षाने संघर्षाची नांदी दिली. त्याचवेळी विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे आव्हान महाविकास आघाडी सरकारने दिले आहे. 

सरकार पाडण्याची भाषा करणारे धन्यच : उपमुख्यमंत्री 

असुरक्षिततेपोटी विधानसभा अध्यक्षांची निवड आम्ही आवाजी मतदानाने करतोय असे विरोधकांना वाटते ना? तर मग त्यांनी आमच्या सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणावा आणि तो मंजूर करवून सरकार पाडून दाखवावे, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना दिले. 
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ बैठकीनंतर पवार यांची पत्रपरिषद झाली. यावेळी  काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यासारखी पूर्ण परिस्थिती असल्याच्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवताना पवार म्हणाले की, १७० आमदारांचा पाठिंबा असलेले सरकार पाडण्याची भाषा करणारे धन्यच म्हटले पाहिजेत. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा.

दरवेळी काही ना काही कारण देऊन मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची विरोधकांना सवयच झाली आहे, असा टोलाही अजित पवार यांनी हाणला. ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात अधिवेशनात नक्कीच चर्चा केली जाईल, शक्ती कायद्याचे विधेयक अधिवेशनात येईल, असे ते म्हणाले.

चहापानावर बहिष्कार

कधी नव्हे ते आज आम्हाला सरकारच्या चहापानाचे निमंत्रण मिळाले आहे, पण ज्या सरकारला लोकशाहीच मान्य नाही, विरोधकांचे बारा आमदार वर्षभरासाठी निलंबित करायचे आणि विरोधकांना चहापानाला बोलवायचे, अशा चहापानाला जाऊन काय करायचे? या सरकारमध्ये शेतकरी, ओबीसी, धनगर, मराठा कोणाचीच सुनवाई होत नाही. घपले आणि घोटाळे असणाऱ्या सरकारच्या चहापानाला जाणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हे तर ‘रोक’शाही अन् ‘रोख’शाहीचे सरकार : फडणवीस 

या सरकारने लोकशाही बंद केली आहे. या सरकारमध्ये ‘रोक’शाही आणि ‘रोख’शाही सुरू आहे. स्थगिती, खंडणी, लूट, भ्रष्टाचाराशिवाय सरकारमध्ये दुसरे काही दिसतच नाही, असे टीकास्त्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र परिषदेत सोडले. अत्यंत कमी कालावधीचे अधिवेशन घेऊन जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ गुंडाळण्याचे काम सरकार करीत आहे. तरीही  जेवढी आयुधे मिळतील, त्यांचा वापर आम्ही करू. एसटीचा संप, ओबीसी आरक्षण, परीक्षा भरती घोटाळा, शेतकऱ्यांची वीज तोडणी, कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा अशा विविध विषयांवर सरकारला घेरू. कोरोनाच्या नावावर झालेला भ्रष्टाचार आम्ही बाहेर आणणार आहोत. कोरोनाचे गौडबंगाल आहे. कोरोनाच्या नावाने कोणी कोणी चांगभले केले ते उघड करू.  मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार आणि कोरोनाकाळातील भ्रष्टाचार बाहेर आणणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: ajit pawar challenge to the opposition if you have courage bring disbelief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.