महाराष्ट्र निवडणूक 2019 : शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत देणार, ही थट्टा लावलीय काय? - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 07:04 PM2019-11-02T19:04:03+5:302019-11-02T19:04:53+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2019 : शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद
मुंबई : अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत शनिवारी (1 नोव्हेंबर) मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, राज्य सरकारकडून देण्यात येणारी ही नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले, "शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत देणार, ही थट्टा लावलीय काय? सरकारला कल्पना नाही, शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं आहे. नुकसानीचा अंदाज घेतला तर कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लागणार आहेत. 10 हजार कोटी कशालाच पुरणार नाही. ही नुकसान भरपाई तुटपुंजी आहे. राज्य सरकारची मदत अपुरी आहे. राज्य सरकारने 25 हजार कोटींची मदत जाहीर करावी."
दरम्यान, आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. तसेच, प्रत्यक्ष स्थितीचे अवलोकन करून मदतीचा तपशील लवकरच ठरवावा, असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
याशिवाय, विमा कंपन्यांकडून सुद्धा मदत देण्यासंबंधी सरकार त्यांच्या संपर्कात आहे. पंचनाम्यांच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. मोबाईलने घेतलेल्या छायाचित्रांना परवानगी देण्यात आली आहे. लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करीत आहोत, परंतु त्याची वाट न पाहता राज्य सरकार आपल्या निधीतून मदत करेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.