... तेव्हा अजित दादांना ५ वर्षासाठी मुख्यमंत्री बनवू, फडणवीसांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 01:30 PM2023-10-04T13:30:10+5:302023-10-04T13:31:07+5:30
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्यासोबत आल्याने पक्षाची ताकद वाढली आहे, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
मुंबई - राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विद्यमान उपमुख्यमंत्रीअजित पवार यांना लवकरच संधी मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रेसंदर्भातील याचिकेवर सुनावणी पूर्ण होताच, राज्याचं सरकार पुन्हा बदलेल, असे भाकितही अनेकजण करतात. त्यामुळे, अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदावर राजकीय वर्तुळात मंथन होत असते. यासंदर्भात एका मुलाखतीत भाजपचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना अजित पवारांना आम्ही ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, असे विधान फडणवीसांनी केले आहे. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावू शकतात.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्यासोबत आल्याने पक्षाची ताकद वाढली आहे, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. शिवसेनेसोबत (शिंदे गट) आमची नैसर्गिक युती आहे. तर अजित पवार आमचे राजकीय साथीदार आहेत. एकनाथ शिंदे आमच्यासोबत आल्याने महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढली. तसेच अजित पवारांनीही साथ दिल्यानं राजकीय अंकगणितही चांगले झाले आहेत, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिलं.
🕧 12.27pm | 4-10-2023 📍 Mumbai | दु. १२.२७ वा. | ४-१०-२०२३ 📍 मुंबई.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 4, 2023
LIVE | India Today Conclave | Mumbai.@IndiaToday#mumbai#maharashtra#indiatodayconclave#ConclaveMumbai23https://t.co/5KZjDafAuq
यावेळी, शिवसेना आमदारांच्या अपात्रेता याचिकेसंदर्भात फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी, जर हे आमदार अपात्र ठरले तर पर्याय म्हणून अजित पवारांना सोबत घेतलं का, त्यांना पुढील ६ महिने मुख्यमंत्री बनवायचं आहे का, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. कारण, मी ६ महिन्यात परिस्थिती बदलून दाखवतो, असे अजित पवार यांनी म्हटल्याचं दाखलाही यावेळी देण्यात आला होता. त्यावर, फडणवीसांनी मोठं विधान केलं आहे.
६ महिन्यात परिस्थिती बदलत नसते. त्यामुळे, जेव्हा बनायचंय तेव्हा अजित दादांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच, सध्या एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आणि तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांवेळी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, त्यांच्याच नेतृत्त्वात आगामी निवडणुका लढवल्या जातील, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.