'अमित शहांचा अजित पवारांवर विश्वास, म्हणूनच गृहमंत्री पुण्यात त्यांच्या सूटमध्ये थांबले'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 01:42 PM2021-12-23T13:42:12+5:302021-12-23T13:54:11+5:30
उपमुख्यमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही, म्हणूनच ते अजित पवारांकडे चार्ज देत नाहीत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्यासंदर्भात मिटकरी यांना प्रश्न विचारण्यात आला होता
मुंबई - मुख्यमंत्री पदाचा चार्ज या विषयावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांचा जर पक्षातील कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकता. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देवू शकतात. मात्र, त्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसेल. त्यामुळेच ते त्यांच्याकडे चार्ज देत नाही, अशी टिका त्यांनी केली होती. यासंदर्भात आमदार अमोल मिटकरी यांना प्रश्न विचारला असता,त्यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला.
उपमुख्यमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही, म्हणूनच ते अजित पवारांकडे चार्ज देत नाहीत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्यासंदर्भात मिटकरी यांना tv 9 च्या पत्रकाराकडून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, मिटकरींनी उत्तर देताना अमित शहांचा विश्वास असल्याचे सांगत पाटील यांना टोला लगावला. 'अमित शहांचा अजित पवार यांच्यावर विश्वास आहे, म्हणूनच अजित पवार यांच्या सूटमध्ये गृहमंत्री पुण्यात थांबले होते. अमित शहा भाजपवाल्यांच्या सूटमध्ये थांबले नाहीत. चंद्रकात पाटील यांना मुख्यमंत्री बनण्याची गोड स्वप्ने पडत आहेत, पण त्यांची ती हौस पूर्ण होत नाही. भाजपची ही लोकं एकदम विकृत आहेत, यांना उठसूट काहीतरी बोलायचंय, असे म्हणत मिटकरी यांनी भाजपा नेत्यांवर टीका केली.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार चांगलं काम करत आहे. तसेच, अजित पवार यांची प्रशासनावर असलेली पकड चंद्रकांत पाटील यांना चांगलं माहिती आहे. मेधाताई कुलकर्णी यांच्या मतदारसंघात घुसकोरी करुन स्वत: सुरक्षित मतदारसंघ शोधणाऱ्यांनी अजित पवार यांच्याबद्दल बोलणं म्हणजे सूर्याला वाकुलं दाखवण्यासारखा प्रकार आहे, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?
पाटील यांच्या टिकेला महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले. रश्मी ठाकरे या कधीच लाईमलाईटमध्ये नसतात. अमृता फडणीवस लाईमलाईटमध्ये असतात त्यांना तुम्ही विरोधी पक्षनेत्या करणार का हे आधी सांगा. एकवेळ आदित्य ठाकरे हे मंत्री आहेत म्हणून त्यांचं नाव घेणं किंवा अन्य कोणाचं हे ठीक आहे. पण रश्मी ठाकरेंचं नाव का घेता. त्या कधीच यात नसतात. महाराष्ट्राचं राजकारण अजून किती खाली आणणार. महिलांचं हनन करणं ही हिंदू संस्कृती नाही, असं पेडणेकर म्हणाल्या.