अजित पवारांना नैतिक अधिकार उरला नाही, पुण्यातील गर्दीवरुन भाजपाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 08:37 AM2021-06-20T08:37:29+5:302021-06-20T08:39:00+5:30
पुण्यातील कार्यक्रमाला झालेली गर्दी टीकेची धनी होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे खुद्द अजित पवारांनी देखील आपणच नियम करायचे आणि मोडायचे हे काही पटत नव्हते असे सांगतानाच तुम्ही नियमांचे पालन केले नाही, अशी खंतही या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली.
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील शहर कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, याप्रसंगी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका समोर असतानाही पक्षाच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी झाल्याने सोशल मीडियावरुन राष्ट्रवादीसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. भाजपा नेत्यांनीही आता अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीला लक्ष्य केलं आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांवर टीका केलीय.
पुण्यातील कार्यक्रमाला झालेली गर्दी टीकेची धनी होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे खुद्द अजित पवारांनी देखील आपणच नियम करायचे आणि मोडायचे हे काही पटत नव्हते असे सांगतानाच तुम्ही नियमांचे पालन केले नाही, अशी खंतही या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली. मात्र, आता सोशल मीडियावर या गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावरुन, राष्ट्रवादीसह अजित पवार यांच्यावर नेटीझन्सही टीका करत आहेत. एकीकडे पुण्यात शनिवार आणि रविवारचा विकेंड लॉकडाऊन पुन्हा सुरू केला आहे. त्यामुळे, गर्दी टाळणे आणि सार्वजनिक कार्यक्रम न घेणे हे सातत्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीतील कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्याने महाविकास आघाडी सरकारवरही टीका होत आहे.
एकीकडे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन अतिशय साध्या पद्धतीने ऑनलाईन बैठक घेऊन साजरा केला. मात्र, दुसरीकडे अजित पवारांच्या उपस्थितीतील ही तोबा गर्दी कोरोनाचे संक्रमण वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळेच, विरोधकांनीही या कार्यक्रमावरुन राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनीही या गर्दीवरुन अजित पवारांना लक्ष्य केलंय.
If 8000-10,000 people gather in an event then Ajit Pawar has no moral right to urge people to follow COVID guidelines. They filed FIR against other party leaders for flouting COVID norms. Action should be taken against them: Praveen Darekar, LoP in Maharashtra Legislative Council pic.twitter.com/h7A8G4zbRk
— ANI (@ANI) June 19, 2021
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला जर 8 ते 10 लोकं एकत्र जमा होत असतील, तर कोविड 19 च्या नियमावलींचं पालन करा, असं सांगण्याचा नैतिक अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उरला नाही. त्यांनीच पक्षाच्या नेत्याविरुद्ध कोविड 19 च्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा. तसेच, संबंधितांवर कारवाईही करण्यात यावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
पुणेकरांच्या संकटात भर टाकणारी गर्दी
भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गोळा केलेली गर्दी ही पुणेकरांच्या संकटात भर टाकणारी आहे. तसेच या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियमांची पायमल्ली करत जगताप यांनी गोळा केलेली गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रित करणारी आणि पुणेकरांच्या जीवाशी खेळणारी आहे. एकीकडे शेकडो वर्षांची शिस्तबध्द परंपरा असणाऱ्या वारकरी संप्रदायाला पायी पालखीसाठी परवानगी नाकारणे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बेशिस्तीचे प्रदर्शन करणे बेजबादारपणाचे आहे. असे आयोजन टाळायला हवे होते. यांच्या चमकोगिरीमुळे खुद्द अजितदादांना दिलगिरी व्यक्त करावी लागली असेही मुळीक यांनी यावेळी म्हटले.