भोवळ आल्याने शुद्ध हरपली, धनंजय मुडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 10:32 AM2022-04-13T10:32:14+5:302022-04-13T10:35:37+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केली दूरध्वनीवरून चौकशी, सुप्रियाताई सुळे, दत्ता मामा भरणे पार्थ दादा पवार आदींनी घेतली भेट

Ajit Pawar met Dhananjay Mude in hospital of mumbai | भोवळ आल्याने शुद्ध हरपली, धनंजय मुडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी दिली माहिती

भोवळ आल्याने शुद्ध हरपली, धनंजय मुडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी दिली माहिती

Next

मुंबई - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी मध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, हे वृत्त चुकीचे आहे; डॉक्टरांनी आणखी काही चाचण्या सांगितल्या असून सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 

आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मुंडे यांची विचारपूस करत डॉक्टरांकडून माहिती घेतली. डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला असून, येत्या तीन-चार दिवसात त्यांना आराम मिळेल, असेही अजित पवार म्हणाले. रुग्णालयाच्या वतीने डॉ. प्रतीत समदानी यांनी अधिक माहिती दिली. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत विश्रांतीचा सल्ला दिला. काल धनंजय मुंडे जनता दरबारास उपस्थित होते, त्यानंतर पवार साहेबांना भेटले, या दरम्यान प्रकृती अस्थिर होऊन त्यांना भोवळ आल्याने शुद्ध हरपली होती, असेही अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसेच, लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. खा. सुप्रिया सुळे, युवक नेते पार्थ पवार, राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली व बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

धनंजय तू आराम कर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आम्ही सर्वजण मिळून यशस्वी करतो - अजित पवार

रुग्णालयातील चर्चे दरम्यान उद्या दि. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून, राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत जयंतीनिमित्त शासकीय कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विभागाने केली आहे. याबद्दल चर्चा करताना, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 'धनंजय तू आधी बरा हो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आम्ही सगळे मिळून यशस्वी करू;' असा स्नेहाचा सल्लाही धनंजय मुंडे यांना दिला. 

काल सायंकाळी धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही विचारपूस करत माध्यमांना मुंडेंच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. काळजी करण्यासारखे काही नाही, असे राजेश टोपे म्हणाले होते.

Web Title: Ajit Pawar met Dhananjay Mude in hospital of mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.