Ajit Pawar :'अन्यथा महायुतीतून बाहेर पडू', मंत्री तानाजी सावंतांच्या वक्तव्याने अजित दादांच्या राष्ट्रवादीचा सूर बदलला; नेत्याने थेट इशाराच दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 08:45 AM2024-08-30T08:45:38+5:302024-08-30T08:46:52+5:30
Ajit Pawar : गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील नेत्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याचे दिसत आहे.
Ajit Pawar ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. विधानसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती विधानसभा निवडणूक एकत्रित लढणार असल्याचे बोलले जात आहे. पण, निवडणुकीआधीच महायुतीमधील नेत्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. काल शिंदे गटाचे नेते मंत्री तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वादग्रस्त वक्तव्य केले, यामुळे आता दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
म्हाडा घरांची लॉटरी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस?; घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना उत्सुकता
काल एका सभेत बोलताना तानाजी सावंत हे वादग्रस्त वक्तव्य केलं. "अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपले आयुष्यभर पटले नाही, मांडीला मांडी लावून बसलो आहोत परंतू बाहेर आल्यावर उलट्या होतात, असे वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते भडकल्याचे दिसत आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी यावरुन शिंदे गटाला टोला लगावला. मिटकरी म्हणाले, 'महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना जर उलट्या होत असतील तर त्या कशामुळे होतात हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील असे म्हटले आहे'.
राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया
दरम्यान, मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले, शिंदे गटाचे मंत्री अशा पद्धतीचे बोलणार असतील तर हे ऐकून घेण्यापेक्षा बाहेर पडलेले बरे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महायुती झाली म्हणून आज तानाजी सावंत हे मंत्री झाले आहेत. आम्ही सत्तेसाठी लाचार नाही, राष्ट्रवादी महायुतीत तानाजी सावंतांमुळे आलेली नाही, असेही पाटील म्हणाले.
अमोल मिटकरींनी केली टीका
या वक्तव्यामुळे आता महायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे, काल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी काल राजकोट घटनेवरुन महायुती सरकारला टोला लगावला आहे. महायुतीमधील आमदार अमोल मिटकरी यांनीही राजकोटमधील फोटो ट्विट करत पुतळा दुर्घटनेवरुन महायुती सरकारला टोला लगावला. त्यावरुन, आता आमदार अमोल मिटकरी आणि नितेश राणे यांच्यात जुंपली आहे. अमोल मिटकरी यांनी नितेश राणेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, त्यांना नेपाळला पाठविण्यासाठी महाराष्ट्रातील जनता उत्सुक असल्याचं म्हटले आहे, यामुळे आता महायुतीमध्ये सूर जुळत नसल्याची चर्चा सुरू आहे.