अजित पवार पोहोचले थेट मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 09:10 AM2023-06-08T09:10:52+5:302023-06-08T09:11:12+5:30
सरकारला कमीपणा आणणारी ही एक बाब आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एवढ्या महत्त्वाच्या रस्त्यावर सतत व्हीआयपी मुव्हमेंट, मुख्यमंत्री आणि पोलिस अधिकाऱ्यांचा वाहतुकीचा मार्ग असणाऱ्या मार्गात ही घटना घडतेय, ही दुर्दैवी बाब आहे. सरकारला कमीपणा आणणारी ही एक बाब आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
बुधवारी मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे यांच्यासह मृत तरुणीच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. अजित पवार पुढे म्हणाले, एकाच मजल्यावर मुलींना एकत्र का ठेवले नाही, हे बघायला हवे. आरोपी राहत होता तो सरकारतर्फे नियुक्त केलेला नव्हता. तसेच, मोबाइल संभाषणावरून तो मुलीच्या संपर्कात होता. काही गोष्टी, साहित्य आणायला त्याला सांगितले जायचे. या घटनेची सखोल चौकशी करत योग्य ती कारवाई करण्याची मागणीही पवार यांनी यावेळी केली.
सामान शिफ्टिंग नको म्हणून खाली येणे टाळले
मृत तरुणीला मैत्रिणीनेही खालच्या रूममध्ये सोबत राहण्यास सांगितले होते. मात्र, दोन दिवसांत रूम रिकामी करणार असल्याने सामान शिफ्टिंग कुठे करणार म्हणून तिने नकार दिल्याचेही समजते. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ७ ते ८ जणांचे जबाब नोंदवले आहेत.