दसरा मेळावा वादात अजित पवारांची उडी; शिंदे-ठाकरे दोन्ही गटाला सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 12:16 PM2022-09-03T12:16:41+5:302022-09-03T12:17:24+5:30
सर्वसामान्य जनता कुणाच्या पाठिशी आहे हे शिवाजी पार्कवरील सभा झाल्यावर कळेल असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मुंबई - राज्यातील सत्तांतरानंतर खरी शिवसेना कुणाची यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्यात येत्या दसरा मेळावा कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. परंतु यंदा दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला आहे. यात आता राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उडी घेत दोन्ही गटाला सुनावलं आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, शिवसेनेच्या स्थापनेपासून आजतागायत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची सभा शिवाजी पार्कवर व्हायची. बाळासाहेब ठाकरेंनी त्याच मैदानात सांगितले होते इथून पुढे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे वाटचाल करेल. परंतु २० जूनपासून अनेक घडामोडी घडल्या त्या सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. आता मैदान वापराची परवानगी मागितली जाते. ज्यांच्या हातात सत्ता ते त्यांना पाहिजे असेल तसं करतात. त्यामुळे वाद घालून चालणार नाही. सर्वसामान्य जनता कुणाच्या पाठिशी आहे हे शिवाजी पार्कवरील सभा झाल्यावर कळेल. त्याचसोबत निवडणुका झाल्यावर कुणाची शिवसेना खरी हेदेखील कळेल असं त्यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांना मुख्यमंत्री शिंदेंना टोला
हल्ली काहींना शो करायची सवय झालीय
माध्यमांकडे सध्या कुठल्या बातम्या नाहीत. अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीसांनी भेटीबाबत नकार दिलाय. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने काम करत असतो. जनता निवडून देत असते. गणेशोत्सव वर्षानुवर्षे सुरू आहेत. यंदा गाठीभेटी वाढल्या आहेत. परंतु आम्हीही गणपतीच्या दर्शनासाठी जातो पण कॅमेरा घेऊन जात नाही. जो गणेशभक्त आहे त्याने अशाप्रकारे देखावा दाखवण्याचं कारण नाही. पूर्वीच्या काळात शोमॅन होते, राज कपूर शोमॅन म्हणून ओळखले जायचे तसं हल्ली काहींना शो करायची सवय आहे. जनतेनेच बघावे काय चाललंय काय नाही असं सांगत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही - कदम
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी दिलीय. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना आहे. त्यांना बाळासाहेबांचे विचार सांगण्याचा अधिकार नाही. खरी शिवसेना कुणाची याबाबत न्यायदेवता निर्णय देईल. उद्धव ठाकरे ज्यावेळी म्हटले बाळासाहेब साधे होते, मी हुशार आहे. त्यादिवशी महाराष्ट्राच्या जनतेला कळालं. शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईवर ते गादीवर बसले. आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना आहोत. त्यामुळे दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांनी घ्यावा अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना करणार आहे असं शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी म्हटलं आहे.