किती सहन करायचे, मराठी द्वेष्ट्यांचा बंदोबस्त करावा लागेल! अजित पवारांनी भरला सज्जड दम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 06:03 AM2022-02-28T06:03:10+5:302022-02-28T06:03:49+5:30

‘मराठी भाषा गौरव दिन’ सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषा आणि माणसांना विरोध करणाऱ्यांचा चांगलाच दम भरला.

ajit pawar said how much to endure marathi haters have to be dealt with | किती सहन करायचे, मराठी द्वेष्ट्यांचा बंदोबस्त करावा लागेल! अजित पवारांनी भरला सज्जड दम

किती सहन करायचे, मराठी द्वेष्ट्यांचा बंदोबस्त करावा लागेल! अजित पवारांनी भरला सज्जड दम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘मराठी भाषा गौरव दिन’ सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषा आणि माणसांना विरोध करणाऱ्यांचा चांगलाच दम भरला. विविध राज्यांतून पैसा कमवायला, पोटाची खळगी भरायला इथे यायचे आणि मराठी माणूस, भाषेचा द्वेष करायचा, हे वागणं बरं नव्हे. या मातीचे ऋण तुमच्यावर आहे, हे विसरू नका. आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, असे सुनावतानाच आता या मराठी द्वेष्ट्यांचा बंदोबस्त करावाचा लागेल, असा थेट इशारा अजित पवार यांनी दिला. 

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मुख्य सोहळा झाला. मराठी भाषेचा गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत मान्यवरांचा गौरव व पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी मराठी द्वेष्ट्यांचा समाचार घेतानाच मराठीजनांच्या अनास्थेवरही बोट ठेवले. राज्य सरकारने दुकानांवरील पाट्या मराठी करण्याचा निर्णय घेतला. त्या विरोधात काही महाभाग, मराठी द्वेष्टे न्यायालयात गेले. स्थानिक भाषा ग्राहकांच्या सोयीची असते, असे न्यायालयानेही त्यांना सुनावले. 

या मराठी द्वेष्ट्यांना माझे एकच सांगणे आहे, तुम्ही इथे येता प्रगतीकरिता त्याबद्दल दुमत नाही, पण मराठी भाषा आणि माणसाला विरोध का करता, आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. मुख्यमंत्री महोदय, या मराठीद्वेष्ट्यांचा आता बंदोबस्त करावा लागेल, असे पवार म्हणाले.
 

Web Title: ajit pawar said how much to endure marathi haters have to be dealt with

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.