'अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हे दहा जन्मात होणार नाही'; पक्षातील गटबाजीच्या चर्चेला दिला पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 11:27 PM2023-07-01T23:27:16+5:302023-07-01T23:29:29+5:30
मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे.
मुंबई- मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. पक्ष संघटनेवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्ये बोलले जात होते. राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात व्यासपीठावरच शरद पवार यांच्यासमोर अजित पवार यांनी पक्ष संघटनेती जबाबदारी मिळावी अशी मागणी केली होती. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीत दोन गट असल्याचे बोलले जात आहे, एक गट खासदार सुप्रिया सुळे यांचा तर दुसरा गट विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आज पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली. या सर्व राजकीय चर्चांना सुप्रिया सुळे यांनी पूर्णविराम दिला.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढचे प्रदेशाध्यक्ष होणार का?; सुप्रिया सुळेंनी सांगितलं समीकरण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष झाल्यानंतर खासदार सुळे यांनी पहिल्यांदाच मुलाखत दिली. लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी लोकमत डॉट कॉमवर खासदार सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेतली.या मुलाखतीत सुळे यांनी अनेक राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात पक्षांतर्गत सामना असल्याची चर्चा आहे. या चर्चेवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार आणि सुप्रिया सुळे सामना असं दहा जन्मात होणार नाही. कारण दादा माझा मोठा भाऊ आणि नेता आहे. माझ्यावर आणि दादावर जे संस्कार झाले आहेत ते पदासाठी नाही तर आम्ही दोघ राजकारणात बदल घडवण्यासाठी आलो आहोत. हे फक्त दादाचं आणि माझं नाही तर राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल हेच माझ्या मनात आहे, असं सांगून सुप्रिया सुळे यांनी या चर्चांना पूर्ण विराम दिला.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढचे प्रदेशाध्यक्ष होणार का?
'राष्ट्रवादी काँग्रेसला नवा प्रदेशाध्य येईल का नाही हे पक्ष ठरवेल, राष्ट्रवादी पक्ष हा दडपशाहीचा पक्ष नाही. पक्षाला अजितदादांना प्रदेशाध्यक्ष पद द्यायचे आहे की भुजबळ साहेबांना द्यायच यावर पक्षामध्ये सविस्तर चर्चा होणार. पक्षात जे काही निर्णय होतात ते सर्वांशी बोलून घेतले जातात. जस अजितदादांच ऐकल जाईल तसे छगन भुजबळ साहेबांचही ऐकले पाहिजे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
'पक्ष हा लोकशाहीने चालतो. त्यामुळे सर्वांच ऐकलं पाहिजे. मी स्वत:ला शरद पवार यांचा वारसदार समजत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा जेव्हा मला जी जबाबदारी देईल तेव्हा ती जबाबदारी मी १०० टक्के वेळ देऊन पूर्ण करेन. मी पक्षाला रिझल्ट द्यायचा मी प्रयत्न करेन. मी पवार साहेबांची वारसदार आहे असं मी समजत नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाले.