आम्हीही ॲक्शन मोडमध्ये! अजितदादांनी विरोधकांना सुनावले, जुन्या घोटळ्यांची चौकशी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 05:44 AM2022-03-03T05:44:01+5:302022-03-03T05:44:46+5:30

संजय राऊतांनी आधीच्या सरकारमधील घोटाळ्यांची कागदपत्रे सरकारकडे दिलेली असून, आम्ही त्यांची तपासणी करीत आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले.

ajit pawar warns opposition we are also in action mode he would investigate the old scams | आम्हीही ॲक्शन मोडमध्ये! अजितदादांनी विरोधकांना सुनावले, जुन्या घोटळ्यांची चौकशी करणार

आम्हीही ॲक्शन मोडमध्ये! अजितदादांनी विरोधकांना सुनावले, जुन्या घोटळ्यांची चौकशी करणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जुन्या सरकारमधील घोटाळ्यांच्या चौकशांसाठी महाविकास आघाडी सरकार ‘ॲक्शन मोड’मध्ये असल्याचे स्पष्ट करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला इशारा दिला. 

पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी आधीच्या सरकारमधील घोटाळ्यांची कागदपत्रे सरकारकडे दिलेली आहेत. आम्ही त्यांची तपासणी करीत आहोत आणि त्यावर योग्य वेळी कारवाई करू. सरकार चालविण्याचा आम्हाला मोठा अनुभव आहे. कधी आणि कशी कारवाई करायची असते, हे आम्हाला बरोबर कळते. कारवाई बुमरँग होणार नाही हे बरोबर बघू, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला. 

मलिक यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार म्हणाले की, मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात. नवाब मलिक यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, असे त्यांचे आता स्पष्ट म्हणणे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जाब विचारणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. राज्यपालांची सहज भेट होत नाही. मात्र, कधी तरी चहा घेताना त्यांना विचारणार असल्याचे पवार यांनी सांगितले. युक्रेनच्या राजधानीचे नाव चुकल्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाचा उल्लेख टाळून पवार यांनी टोला लगावला. ‘काही माहिती नसेल तर बोलू नये. उगाचच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’, अशा शब्दांत पवार यांनी राणेंना डिवचले.

अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. परंतु, त्याबाबतचा अंतिम निर्णय संसदीय कामकाज सल्लागार समितीचा राहणार आहे. मागील अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पुरेसा वेळ नव्हता. मात्र, या अधिवेशनात निवडणूक होईल. त्यासाठी राज्यपाल सकारात्मक भूमिका घेतील. आम्ही राज्यपालांची परवानगी मागण्यासाठी पत्र दिले आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. पत्रकार परिषदेला  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते.

यंदा असणार मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

- या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शंभर टक्के उपस्थित राहणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

- हिवाळी अधिवेशनातही ठाकरे येणार असल्याचे सांगून त्याबाबत लिहून देऊ का, अशी विचारणा पवार यांनी पत्रकारांना केली होती. 

- तरीही मागील अधिवेशनात ठाकरे आले नव्हते. त्यामुळे आता ते येणार असल्याचेही पवार यांनी पुन्हा एकदा सांगितले.

Web Title: ajit pawar warns opposition we are also in action mode he would investigate the old scams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.