शरद पवार यांच्या परवानगीनेच अजित पवार भाजपमध्ये जाणार, रवि राणांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 06:34 PM2023-04-17T18:34:05+5:302023-04-17T18:35:17+5:30
देवेंद्र फडणवीस, अमित शहा व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर अजित पवार यांना विश्वास आहे
मुंबई - राज्याच्या राजकारणात गेल्या ८ दिवसांपासून अजित पवार आणि त्यांच्या भूमिकांविषयीच चर्चा सुरू आहे. त्यातच, महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळेचही अजित पवार आणि भाजप प्रवेश पुन्हा चर्चेत आहे. अजित पवार हे भाजपमध्ये जाऊन त्यांना समर्थन देतील अशा चर्चा होत असतानाच, यावर आमदार रवी राणा यांनी खळबळजनक विधान केलं आहे. अजित पवार हे 33 महिन्याच्या सरकारला कंटाळलेले होते, त्यांचा श्वास तिथे गुदमरत होता, असे विधान आमदार राणा यांनी केले आहे. तसेच, शरद पवार भाजपमध्ये जाणार असल्याचेही त्यांनी म्हटलंय.
देवेंद्र फडणवीस, अमित शहा व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर अजित पवार यांना विश्वास आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार यांनी कधीही मन लावून काम केलेलं नाही. अजित पवार त्यांचे राहिलेले स्वप्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येऊन पूर्ण करतील. शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांच्या डोक्यावरचा हात काढला तर उध्दव ठाकरे यांच्यासोबत एकही आमदार राहणार नाही. तर, शरद पवार यांच्या परवानगीने अजित पवार भाजपमध्ये जाणार आहेत, असा गौप्यस्फोटही आमदार रवि राणा यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या एकेरी धोरणामुळे अजित पवार नाराज असल्याचंही त्यांनी म्हटलं.
विधान सभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. दादांसोबत राष्ट्रवादीचे काही आमदारही जाणार असल्याचे बोलले जाते. अलीकडील अजित पवारांची विधाने पाहिली असता दादा सरकारबद्दल कुठेही आक्रमक वक्तव्य करताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच, आता राष्ट्रवादी आमदारांनीही उघडपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतही गट पडणार का? असे बोलले जात आहे.
३० एप्रिलपर्यंत पक्षप्रवेश - बावनकुळे
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल कधीही लागू शकतो. त्याआधीच भाजपाने सरकार वाचवण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची चाचपणी सुरू केलीय असं म्हटलं जाते. त्यात प्रामुख्याने अजित पवारांसह राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपासोबत जातील असं बोलले जात आहे. सध्या यावर कुणीही थेट भाष्य करत नाही. मात्र ३० एप्रिलपर्यंत भाजपात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहेत असं सूचक विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
ज्यांना जायचं तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल
केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करून विरोधी पक्षाचे नेते फोडायचे काम सुरू आहे. शिवसेनेच्या बाबतीत तेच झालं. आमचे आमदार फोडले. आदित्य ठाकरे यांनी यावर खुलासा केला कसे नेते रडत होते. आम्हाला तुरुंगात जायचं नाही तेच तंत्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत वापरत आहेत असं संजय राऊतांनी म्हटलं होते. त्याचसोबत उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, काही झालं कितीही दबाव आला तरी पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही. यावर काही लोकांना जायचं आहे. तो त्यांचा वयक्तिक निर्णय असेल. काही कुटुंबावर दबाव आहे, मुलांवर दबाव आहे, घरातील महिलांना चौकशीसाठी बोलावलं जात आहे असे आमदार दबावाखाली निर्णय घेतात. तो निर्णय त्यांचा असेल तो पक्षाचा निर्णय नसेल असा खुलासा पवारांनी केला.