शिवसेनेच्या शाखेत अजित पवारांची 'दबंग' स्टाईल, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 10:17 PM2021-04-16T22:17:33+5:302021-04-16T22:20:29+5:30
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अजित पवार यांनी तडाखेबंद प्रचार केला. या मतदारसंघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ते तळ ठोकून बसले होते.
मुंबई - राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून राज्य सरकार कठोर निर्णय घेत आहे. मात्र, राज्य सरकारच्या कठोर निर्णयानंतर पंढरपूर-मंगळवेढा निवडणुकीतील गर्दीचं उदाहरण देऊन सरकारला लक्ष करण्यात येतंय. याबाबत, पुण्यात कोरोनासंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत अजित पवार यांनी रोखठोक मत माडंल. आता, पंढरपूर निवडणुकीसाठीची प्रचार संपला आहे. मात्र, सोशल मीडियावर अजित पवार यांचा शिवसेना शाखेतील एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, अजित पवार गॉगल लावून एकटेच खुर्चीवर बसल्याचे दिसत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अजित पवार यांनी तडाखेबंद प्रचार केला. या मतदारसंघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ते तळ ठोकून बसले होते. मतदारसंघातील शेवटच्या प्रचारसभेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबरी टाकीही अजित पवार यांनी केली. दरम्यान, याच कालावधीत अजित पवारांनी पंढरपूर आणि मंगळवेढा हे दोन्ही तालुके अक्षरश: पिंजून काढले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे (15 एप्रिल) रोजी ते मंगळवेढ्यातील शिवसेनेच्या शाखेत गेले होते. अजित पवारांचा शिवसेनेच्या शाखेतील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
सध्या भाजपच्या तिकीटावर लढणारे समाधान आवताडे आधी शिवेसेनेत होते. त्यांनी सेनेची मंगळवेढ्यात चांगली बांधणी केली होती. मात्र, सध्या ते याच मतदारसंघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी थेट शिवसेना संपर्क कार्यालयात जाऊन बैठक घेतली. त्यावेळी, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हेही त्यांच्यासमवेत होते. या फोटोत अजित पवार हे शिवसेना कार्यालयात गॉगल लाऊन खुर्चीवर बसल्याचे दिसत आहेत. तर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे पक्ष कार्यालयात खाली कार्यकर्त्यांसह बैठक मारून बसल्याचे दिसून येते. अजित पवार यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.