अजितदादा अनुपस्थित, प्रश्न उपस्थित; नाराजी का? हवंय तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 05:12 AM2023-10-04T05:12:34+5:302023-10-04T05:14:05+5:30
अजित पवारांची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी, शिंदे-फडणवीस दिल्लीत; नाराजीच्या राजकीय चर्चांना उधाण
अतुल कुलकर्णी / यदु जोशी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित नसल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला. संध्याकाळी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे अजित पवारांच्या नाराजीची चर्चा अधिकच गडद झाली.
दैनंदिन कार्यक्रमानुसार अजित पवार सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ४.३० मंत्रालयात उपस्थित राहणार होते. मात्र, तब्येत बरी नसल्याचे कारण देत ते मंत्रालयात आलेच नाहीत. दिवसभर ते आपल्या देवगिरी या निवासस्थानीच होते. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता, ते म्हणाले, अजित पवार यांची तब्येत ठीक नाही. त्यामुळे ते आले नाहीत. वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही.
अजित पवार यांच्या घशात जंतुसंसर्ग झाल्याने त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे ते बैठकांना हजर नव्हते, असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (पवार गट) सुनील तटकरे यांनी केला.
अमित शहांसोबत एक तास चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित नाराजीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यासाठी तातडीने दिल्लीमध्ये दाखल झाले. ६ अ, कृष्ण मेनन मार्ग येथील शहा यांच्या निवासस्थानी हे दोन्ही नेते मागच्या दाराने पोहोचल्यामुळे या बैठकीचे गूढ आणखीच वाढले.
नाराजीच्या राजकीय चर्चांना उधाण
मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याबद्दल व पालकमंत्रिपदाचे वाटप होत नसल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हवे आहे, तसेच आणखी २ जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद त्यांना हवे आहे.
छगन भुजबळ यांना नाशिकचे, हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे, धनंजय मुंडे यांना बीडचे, तर आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळावे, असाही त्यांचा आग्रह असल्याचे मानले जाते.
सध्या पुण्याचे पालकमंत्रिपद भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. ठाणे आणि साताऱ्याचे पालकमंत्रिपद शंभूराज देसाई यांच्याकडे आहे. रायगडचे पालकमंत्रिपद शिंदे गटाचे उदय सामंत यांच्याकडे आहे.
रायगडमधून आदिती तटकरे मंत्री झाल्या आहेत. सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे, म्हणून अजित पवार यांच्या गटाला रायगडचे पालकमंत्रिपद हवे आहे. साताऱ्याचे पालकमंत्रिपद पवार यांना राष्ट्रवादीसाठी पाहिजे. यातली कुठलीच मागणी मान्य होत नाही म्हणून अजित पवार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. दबावाच्या राजकारणाचा हा एक भाग असू शकतो, असे शिंदे गटाला वाटते.
सर्वांना हवा विस्तार
दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनाही मंत्रिमंडळाचा विस्तार हवा आहे; पण भाजपच्या श्रेष्ठींकडून विस्ताराला मान्यता मिळत नसल्याने अडचण झाली आहे. विस्ताराचा मार्ग मोकळा व्हावा म्हणूनच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेल्याचे सांगितले जाते.
तिढा सुटेल?
पुण्याचे पालकमंत्रिपद भाजप सोडायला कदाचित तयार होईल, मात्र शिंदे गटाकडून सातारा आणि रायगडचे पालकमंत्रिपद सोडले जाणार नाही, असे सांगण्यात येते. तिढा सोडवण्यासाठी दिल्लीतूनच निर्णय होतील.
माेकळीक नाही?
वित्तमंत्री म्हणून काम करताना अजित पवार यांना हवी तशी मोकळीक मिळत नाही, अशीही चर्चा आहे. एकतर त्यांच्याकडून फाईल ही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जाते व तेथून मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मान्यतेसाठी जाते. ते बारकाईने सर्व बाजू तपासतात.