अजित पवारांच्या डोळ्यात पाणी, आम्हालाही भावना आहे की नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 04:24 PM2019-09-28T16:24:59+5:302019-09-28T16:26:01+5:30
शरद पवार यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो, विशेष म्हणजे कुटुंबातील कलहाबाबत बोलताना अजित पवारांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई - अजित पवार यांनी पवार कुटुंबीयातील गृहकलहासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्या कुटुंबात कसलाही कलह नाही, कृपया करुन तसं काहीही अफवा पसरु नका. आमचं कुटुंब एकत्र असून पवारसाहेबांचा निर्णय कुटुंबात अंतिम मानला जातो. शरद पवार हे कुटुंबाचे प्रमुख असल्याने त्यांचा शब्द पाळला जातो, असे अजित पवार यांनी म्हटले. सुरुवातीला राजकारणात सुप्रिया आल्यावरही असंच उकरलं. नुकतंच पार्थही राजकारणात आल्यावर पुन्हा तेच, आता रोहित आल्यावरही पुन्हा तेच, असे म्हणत आमच्याच कुठलाही गृहकलह नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. यावेळी, अजित पवारांना अश्रू अनावर झाले.
शरद पवार यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो, विशेष म्हणजे कुटुंबातील कलहाबाबत बोलताना अजित पवारांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करताना अजित पवारांनी यापूर्वीही 72 हजार कोटींचा घोटाळा असं म्हटलं. तर, आताही 25 हजार कोटींचा घोटाळा काढलाय, म्हणजे तुम्हालाही वाटेल ह्या अजित पवारला काही हजार कोटींशिवाय जमतच नाही का?. अहो, मीही तुमच्यासारखा माणूसचं आहे, मलाही भावना आहेत, असं म्हणता अजित पवारांमधील भावनिक माणूस महाराष्ट्राला पाहायला मिळाला. अजित पवारांच्या डोळ्यात पाणी तरळले, तसेच या घोटाळ्याशी माझा संबंध नसून जाणीवपूर्वक मला टार्गेट केलं जातंय, असेही अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याबद्दल खुलासा केला आहे. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या राजानाम्याचं गुढ अजित पवारांच्या तोंडूनच उलगडलं आहे. आमचे बोर्ड जेव्हा बरखास्त झालो तेव्हा बिनविरोध निवडून आलेले होतो. माझ्याआधी पुणे जिल्ह्यातून दिलीप पळसे पाटील होते. राजकीय नेतेच नाहीत तर अन्य लोकही होते. चौकशी लागली त्यावर काही बोलायचे नाही. सभागृहात 1 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला. याचिका दाखल करण्याचा सर्वांना अधिकार आहे, असे म्हणत अजित पवारांनी याचिकाकर्त्यांचे स्वागत केले.
याचिकाकर्त्यांनी 25 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याच आरोप केला. ज्या बँकेच्या ठेवी 10-12 हजार कोटी आहेत त्या बँकेत 25 हजार कोटींचा गैरव्यवहार कसा होऊ शकतो. नुकतीच पंजाब महाराष्ट्र बँकेवर बंदी आली आहे. अनेक राजकीय नेते आधीपासून राज्य बँकेवर होते. त्यांच्या काळातही साखर कारखाने, सूतगिरण्या विक्रीला काढण्यात आल्या. राज्य बँक ही शिखर बँक आहे. एखादा सरकारी साखर कारखाने, सूतगिरण्या दुष्काळ किंवा अन्य संकटामुळे अडचणीत येतात तेव्हा आऊट ऑफ दी वे जाऊन मदत करावी लागते. या राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच चार कारखान्यांना मदत केली आहे. केंद्र सरकारही करते. माझ्या काळात जे कर्जवाटप झाले ते फिटलेले आहे. सरकारने हमी दिली होती. कर्ज कारखाने विका आणि कर्ज फेडण्याचे आदेश होते. यामुळे कारखाने विकण्यात आले. आज ही बँक 285 कोटी नेट प्रॉफिटमध्ये आहे. मग 25 हजार कोटींचा घोटाळा झाला तर ही बँक बुडाली नसती का, असे पवार म्हणाले. राज्य शिखर बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात शरद पवारांचा काडीचा संबंध नाही, दुरान्वये संबंध नाही. मात्र, त्यांचे नाव यात आल्याने मी अस्वस्थ झालो होतो, असे अजित पवार यांनी म्हटले.