Ajit Pawar: "लोकप्रतिनिधी नसताना हजारो कोटींची कामे का?", आदित्य ठाकरेंना अजित पवारांची साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 03:18 PM2023-01-17T15:18:38+5:302023-01-17T15:19:03+5:30
काल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्ते कामावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई- काल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्ते कामावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नसताना एवढ्या हजार कोटींची कामे काढण्याची घाई का? आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या गोष्टीत शंभर टक्के तथ्य आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
आदित्य ठाकरे यांनी मुंबई मनपातील रस्ता गैरप्रकारांबाबत ज्या बर्याच गोष्टी सांगितल्या त्यात शंभर टक्के तथ्य आहे. मुंबईवर प्रशासक आहे. प्रशासक व नगरविकास खात्याची वस्तुस्थिती काय आहे याचे महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. यावर आयुक्त आणि त्यांच्या टीमचे काय म्हणणे आहे हे राज्याला व मुंबईकरांना कळले पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.
आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या रस्ता गैरप्रकारांबाबत पत्रकारांनीही खोलात जाऊन माहिती घ्यावी असे आवाहनही अजित पवार यांनी केले. मुंबईत रस्त्यांची जी कामे सुरू आहेत, त्यामध्ये परकिलोमीटर काय खर्च येतो हे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे, आणि मलाही त्याबद्दल माहिती आहे. आदित्य ठाकरे यांनी जो परकिलोमीटर १७ कोटी रुपये खर्च येतो हे सांगितले परंतु एवढा परकिलोमीटर खर्च येत नाही. मुंबई हे शहर सात बेटांवर वसलेले आहे. यामध्ये सर्व्हिस देणार्या ४० प्रकारच्या बाबी आहेत. त्या जमिनीखालून चालतात त्यामुळे ताबडतोब कामे होऊ शकणार नाहीत त्याला काही काळ लागणार आहे. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नसताना एवढ्या हजार कोटींची कामे काढण्याची घाई का? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.
Eknath Khadse: नाथाभाऊ गेले कुठे? ५ दिवसांपासून खडसे नॉट रिचेबल, मतदारसंघात खळबळ
मुंबई मनपाचा अर्थसंकल्प मागच्यावर्षी झाला मग अर्थसंकल्प झाला असताना इतके कोटी रुपये कुठून आणणार आहात. कट कुठे लावला हे कळायला मार्ग नाही. सरकारमध्ये आलोय म्हणून घिसाडघाईने सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रीट करणार हे ऐकायला कानाला फार बरं वाटतं त्यात मिडियाला सांगायला पण चांगलं वाटतं परंतु ते खरंच शक्य आहे का? एकंदरीत भौगोलिक परिस्थिती बघता त्याची अंमलबजावणी होऊ शकते का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत सरकारने आत्मचिंतन व आत्मपरीक्षण केले पाहिजे असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.