'शिवतीर्थ'वर पाहुण्यांची मंदियाळी, सुनेत्रा पवारांनी घेतली राज ठाकरे आणि कुटुंबीयांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 09:19 AM2021-11-30T09:19:50+5:302021-11-30T09:20:11+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर 'शिवतीर्थ' या नवीन निवासस्थानी प्रवेश केला.
मुंबई: काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या नवीन घरात राहायला गेले आहेत. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी 'शिवतीर्थ' या आपल्या नवीन निवासस्थानात गृहप्रवेश केला. नवीन घरात प्रवेश केल्यापासून राजकारणासह विविध क्षेत्रातील मंडळी राज ठाकरेंच्या नव्या घरी जाऊन त्यांची सदिच्छ भेट घेत आहेत. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे आणि कुटुंबाची भेट घेतली.
राज्याच्या राजकारणात वर्षा, मातोश्री आणि सिल्वर ओक या घरांना जितके महत्त्व आहेत, तितकेच महत्त्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानाला आहे. अलीकडेच दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला. राज ठाकरे हे कृष्णकुंजवर राहत होते. पण, त्यांनी कृष्णकुंजशेजारीच शिवतीर्थ हे घर बांधलं आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही राज ठाकरेंची भेट घेऊन भोजनाचा आस्वाद घेतला. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
विविध मान्यवरांनी घेतली राज ठाकरेंची भेट
कृष्णकुंजच्या शेजारीच बांधण्यात आलेल्या शिवतीर्थवर अनेक मान्यवर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकर यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्या भेटीचा व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल झाले होते. त्यानंतर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंना आपल्या लेकीच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या पत्नीसोबत राज ठाकरेंची शिवतीर्थवर भेट घेतली होती. यासह विविध मान्यवर राज ठाकरेंच्या भेटी घेत आहेत.
कसं आहे राज ठाकरेंचं नवं घर ?
कृष्णकुंज शेजारी बांधण्यात आलेल्या शिवतीर्थ या पाच मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. याच इमारतीतमध्ये मनसेचे मुख्य कार्यालय देखील आहे. इतर मजल्यावर ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या इमारतीमध्ये सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त असे एक भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आले आहे.