'अजितदादा अर्थमंत्री, पण फडणवीसांनी निधी रोखला'; रोहित पवारांनी दाखवलं बोट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 01:47 PM2023-10-22T13:47:51+5:302023-10-22T13:53:34+5:30

आमदार रोहित पवार सातत्याने भाजपा आणि सत्ताधारी सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधतात.

Ajitdada finance minister, but Fadnavis withholds funds; Rohit Pawar showed the finger do dycm devendra Fadanvis | 'अजितदादा अर्थमंत्री, पण फडणवीसांनी निधी रोखला'; रोहित पवारांनी दाखवलं बोट

'अजितदादा अर्थमंत्री, पण फडणवीसांनी निधी रोखला'; रोहित पवारांनी दाखवलं बोट

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला असून राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना मंत्रीपद देण्यात आलंय. त्यापैकी, अजित पवार यांना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपद मिळालं आहे. विशेष म्हणजे नुकतेच त्यांना पुण्याचे पालकमंत्री पदही देण्यात आलं आहे. त्यामुळे, अजित पवार यांचा सत्तेतील दबदबा दिसून येतो. मात्र, अजित पवार यांच्याकडे अर्थखातं असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन माझ्या मतदारसंघातील कामाला निधी देण्यात येत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. 

आमदार रोहित पवार सातत्याने भाजपा आणि सत्ताधारी सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधतात. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आणि माध्यमांतून ते सरकारवर, तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करतात. अनेकदा अजित पवारांवर बोलण्याचं, थेट टीका करण्याचं ते टाळतात. आता, पुन्हा एकदा त्यांनी अजित पवार यांच्यावर थेट टीका करणं टाळलं असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला आहे. 

माझ्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांचं काम अर्धवट होऊन निधीअभावी ठप्प झालंय.. अर्थमंत्री अजितदादा आहेत, मात्र या रुग्णालयासाठी आपल्या संमतीशिवाय निधी द्यायचा नाही, अशा सूचना फडणवीस साहेब आपण दिल्यात. हा आपल्या समकक्ष असलेल्या अजितदादांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याचा प्रकार असून तो योग्य वाटत नाही. दुसरं म्हणजे उपचाराअभावी एखाद्याचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी आपण आणि आरोग्यमंत्री घेणार का?, असा सवालही रोहित पवार यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला आहे. 

राजकारण तर आपण नेहमीच एकमेकांच्या विरोधात करतो. पण, ते विचारांचं आणि तत्त्वांचं असावं. राजकारणापायी सामान्य माणूस भरडला जाऊ नये, हे आपल्यासारख्या मोठ्या नेत्याला सांगण्याची वेळ यावी, यापेक्षा दुर्दैव ते काय, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तसेच, हे शेअर केलेले फोटो बघितले तर इतकं काम होऊनही १ रुपयाही निधी दिलेला नाही आणि अशीच अवस्था राज्यातील इतर २६ कामांचीही आहे.
मायबाप सरकार हे आपल्याला तरी योग्य वाटतं का?, असा प्रश्न रोहित पवार यांनी फडणवीसांना उद्देशून केला आहे. 

दरम्यान, रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा दसऱ्याच्या दिवसापासून सुरू होत आहे. या संघर्ष यात्रेदरम्यान ते सरकारच्या कारभारावर हल्लाबोल करणार आहेत. तसेच, तरुणाईमध्ये शरद पवार यांच्या विचारांचा जागर करण्याचा आणि त्यांचे प्रश्न मांडण्याचा रोहित पवार यांचा प्रयत्न आहे. 

Web Title: Ajitdada finance minister, but Fadnavis withholds funds; Rohit Pawar showed the finger do dycm devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.