हायकाेर्टाकडून प्रश्नांच्या फैरी; तो एन्काउंटर असूच शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 07:53 AM2024-09-26T07:53:53+5:302024-09-26T07:57:18+5:30

अक्षय शिंदे चकमक प्रकरण

Akshay Shinde encounter case questions from the High Court | हायकाेर्टाकडून प्रश्नांच्या फैरी; तो एन्काउंटर असूच शकत नाही

हायकाेर्टाकडून प्रश्नांच्या फैरी; तो एन्काउंटर असूच शकत नाही

मुंबई :पोलिसांनी अक्षय शिंदेच्या थेट डोक्यातच गोळी का मारली, अक्षयने जेव्हा पोलिसांकडून पिस्तूल हिसकावून घेतले तेव्हा त्याला ते अनलॉक कसे करता आले, त्याला बंदूक चालवता येत होती का, अशा असंख्य प्रश्नांच्या फैरी झाडत उच्च न्यायालयानेबदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या एन्काउंटर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत झाला प्रकार एन्काउंटर असूच शकत नाही, असे परखड मत नोंदविले. 

मृत अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी मुलाची बनावट चकमकीत हत्या करण्यात आल्याचा दावा करत या प्रकरणाचा विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) तपास व्हावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर बुधवारी न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.  

सुनावणीवेळी न्यायालयाने क्राइम ब्रँच व ठाणे पोलिसांच्या तपासातील त्रुटी दाखविल्या. विशेषतः फॉरेन्सिक पुराव्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. हितेन वेणेगावकर यांनी सरकारची बाजू मांडली. आरोपीवर गोळी दूरवरून झाडली की पॉइंट ब्लँक रेंजने, अशीही विचारणा न्यायालयाने केली. आरोपीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे तोंडी आदेशही न्यायालयाने दिले. पुढील सुनावणी ३ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.

उत्तरांवर न्यायालयाचे समाधान नाही...

पोलिसांनी आरोपीच्या थेट डोक्यातच गोळी का मारली? 

सरकारी वकील : पोलिस सहायक निरीक्षक दर्जाचा अधिकारी आहे. 

न्या. चव्हाण : या स्थितीचा समान कसा करायचा, हे माहीत नाही, असे तो अधिकारी बोलू शकत नाही. आधी गोळी कुठे मारायची, याबाबत त्यांना माहीत असेल. ज्या क्षणी त्याने बंदुकीचा ट्रिगर ओढला त्यावेळी गाडीतील अन्य पोलिस त्याला सहज काबू करू शकले असते. आरोपीची शरीरयष्टी धिप्पाड नव्हती. त्याला एन्काउंटर म्हणता येणार नाही. सत्य समोर आणा म्हणजे लोक स्वतःच निष्कर्ष काढणार नाहीत.

आरोपीला बंदूक लोड कशी करतात, हे माहीत होते का? 

सरकारी वकील : आरोपी आणि पोलिसांमध्ये पिस्तुलाची खेचाखेच झाली. त्यात बंदुकीचे मॅगझीन बाहेर आले आणि बंदूक लोड  झाली.
न्या. चव्हाण : पोलिसांच्या या म्हणण्यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. अशक्त माणूस पिस्तूल लोड करू शकत नाही. त्यासाठी ताकद लागते. तुम्ही कधी पिस्तूल वापरली आहे का? मी १०० वेळा वापरली आहे. त्यामुळे मला माहीत आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपीला नेत असताना पोलिस इतके निष्काळजीपणे कसे वागू शकतात?  

अक्षय शिंदेंच्या डोक्यातच गोळी का मारली? 
पोलिस डोक्यात गोळी मारतात की पायावर? 
आरोपीवर नियंत्रण का मिळविले नाही, गोळी का मारली?  
गोळी दूरवरून झाडली की पॉइंट ब्लँक रेंजने?
एका आरोपीला ३ पोलिस कंट्रोल करू शकत नव्हते का? 
पोलिसांची पिस्तूल अनलॉक का होती? 

Web Title: Akshay Shinde encounter case questions from the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.