अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 11:56 AM2024-11-19T11:56:32+5:302024-11-19T11:58:56+5:30
मृत अक्षय शिंदेच्या हातावर बंदुकीच्या गोळ्यांचे अवशेष नसणे, त्याला दिलेल्या पाण्याच्या बाटलीवर त्याच्या बोटांचे ठसे न सापडणे, हे अजब आहे, असे भाष्य न्यायालयाने केले.
मुंबई : बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित चकमकीतील मृत्यूच्या तपासात निष्काळजीपणा केला जात असल्याची टिप्पणी करत उच्च न्यायालयाने सोमवारी सीआयडीला फटकारले. तपास गांभीर्याने करण्यात येत नसून त्यात अनेक त्रुटी आहेत, असे निरीक्षण न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने नोंदविले.
मृत अक्षय शिंदेच्या हातावर बंदुकीच्या गोळ्यांचे अवशेष नसणे, त्याला दिलेल्या पाण्याच्या बाटलीवर त्याच्या बोटांचे ठसे न सापडणे, हे अजब आहे, असे भाष्य न्यायालयाने केले. तसेच शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी चौकशी करत असलेल्या दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे सादर करण्यास विलंब झाल्यानेही न्यायालयाने सीआयडीवर ताशेरे ओढले.
सत्य शोधण्याचा आणि प्रत्येक पुरावा दंडाधिकाऱ्यांसमोर मांडला जात आहे की नाही? यावर लक्ष ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर तपास योग्यप्रकारे चालू आहे की नाही, हेही आम्हाला पाहायचे आहे. आम्हाला नि:ष्पक्ष चौकशी हवी आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
दोन आठवड्यांत तपास पूर्ण करा
- तपासातील त्रुटी झाकण्यासाठी आणखी किती युक्तिवाद करणार? असा सवाल न्यायालयाने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांना केला.
- तपास कोणत्या पद्धतीने चालला आहे, हे पाहण्यासाठी आणि सांगण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची आवश्यकता नाही, असे म्हणत न्यायालयाने सीआयडीला दोन आठवड्यांत तपास पूर्ण करण्याचे आणि सर्व पुरावे दंडाधिकाऱ्यांपुढे सादर करण्याचे आदेश दिले.
प्रश्नांची सरबत्ती
- दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे सादर करण्यास विलंब का होत आहे? तुम्ही अजूनही साक्षीदारांचे जबाबच नोंदवत आहात.
- दंडाधिकाऱ्यांकडून सोमवारी अहवाल येणार होता आणि पोलिस जबाब नोंदवत आहेत. याचा अर्थ तपास गांभीर्याने केला जात नाही.
- शिंदेचा मृत्यू पोलिस कोठडीत झाला आहे की नाही, याची चौकशी दंडाधिकाऱ्यांना करायची आहे.
- पोलिसांनी पुरावे सादर केले नाहीत तर दंडाधिकारी त्यांचे काम कसे करतील? अशी सरबत्ती न्यायालयाने केली.