सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणासंबंधी सर्व याचिका उच्च न्यायालयाने काढल्या निकाली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 04:52 PM2020-08-21T16:52:13+5:302020-08-21T17:01:59+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा हवाला
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी निकाली काढल्या. सर्वोच्च न्यायालयाने दोनच दिवसांपूर्वी सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा हवाला देत मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. रेवती मोहिते- डेरे यांच्या खंडपीठाने या याचिका निकाली काढल्या.
एका याचिकाकर्त्यांच्यावतीने ऍड. सुभाष झा यांनी न्यायालयाला सांगितले की, गेल्यावेळी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अधिक्षक दर्जाचा पोलीस अधिकारी मुंबईत आला असताना मुंबई महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या अधिकाऱ्याला अलगिकरण करण्यास सांगितले. तपासासाठी आलेल्या अधिकाऱ्याला सहकार्य करण्यात आले नाही. त्याच धर्तीवर आता सीबीआयच्या अधिकाऱ्यांनाही अलगिकरण करण्यास सांगतील. राज्य सरकार, मुंबई महापालिकेचे वकील उपस्थित येथे उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून आश्वासन घ्यावे की ते सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सर्व सहकार्य करतील. त्यांना अडविण्यात येणार नाही, अशी मागणी झा यांनी न्यायालयाला केली.
जर याचिकाकर्त्यांना असे वाटत आहे की, राज्य सरकार, मुंबई पोलीस किंवा पालिका सीबीआयला सहकार्य करणार नाही तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावे. याचिकाकर्त्यांनी केवळ भीती व्यक्त केली आहे. खरोखरच तसे घडले तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावे. आधी होऊ द्या तसे.तसे काही घडल्यास प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाचे त्यांना फटकारेल. सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशामुळे सीबीआयचे अधिकारी येथे येणार आहेत, असे न्यायालयाने म्हटले.
कोलकात्याच्या वकील प्रियांका तब्रेवाल व द्विवेंद्र दुबे या विद्यार्थाने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. १४ जून रोजी सुशांतसिंग राजपूत याने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.