मित्रपक्षांनी दबाव वाढविला; जागांबाबत भाजप बॅकफूटवर! राज्यातील नेत्यांना हट्ट सोडावा लागणार
By यदू जोशी | Published: March 13, 2024 05:54 AM2024-03-13T05:54:43+5:302024-03-13T05:56:13+5:30
आता भाजप ३१, शिवसेना १३ आणि राष्ट्रवादी ४ असा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र तिढा कायम आहे.
यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील भाजपच्या नेत्यांनी ३४ ते ३५ जागा महायुतीमध्ये आपल्याकडे घ्या, असा हट्ट दिल्लीतील श्रेष्ठींकडे धरला असला तरी तो अद्याप मान्य झालेला नाही. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादीने सन्मानजनक वाटा देण्यासाठी दबाव वाढविल्याने भाजपला हा आकडा गाठता येण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. आता भाजप ३१, शिवसेना १३ आणि राष्ट्रवादी ४ असा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र तिढा कायम आहे.
एकदोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला भाजप नेत्यांशी चर्चा करतील. त्यामुळे दोन दिवस तरी महायुतीची यादी येणार नाही, असे चित्र आहे. शिवसेनेने अधिक जागा मागण्यापेक्षा हमखास जिंकणाऱ्या जागा घ्याव्यात, असे भाजपकडून समजवले आहे. मात्र, शिवसेनेचा १३ पेक्षा अधिक जागांचा आग्रह आहे. सेनेला दहाच्या आत जागा दिल्यास मित्रपक्षाचा वापर भाजप करून घेतो, अशी टीका होईल, असे भाजपच्या श्रेष्ठींना वाटते. शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले की, भाजपच्या बारामती वगळता २४, शिवसेनेच्या १३ आणि राष्ट्रवादीच्या चार असे मिळून ४१ जागा होतात. उरलेल्या सात जागांपैकी कोणाला किती जागा द्यायच्या याचा निर्णय दिल्लीत होईल.
‘सेनेला १३, तर राष्ट्रवादीला ४ जागा द्याव्या लागतील’
एका ज्येष्ठ भाजप नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले, शिवसेनेला किमान १३ जागा व राष्ट्रवादीला चार जागा आम्हाला सोडाव्या लागतील असे दिसते. भाजपने २०१९ मध्ये २५ जागा लढविल्या. त्यातील २४ आम्ही लढवू, एक बारामतीची जागा अर्थातच राष्ट्रवादीकडे जाईल. उर्वरित २४ जागांमध्ये ३ पक्षांना वाटा द्यावयाचा आहे.
काही नावे जवळपास पक्की
राष्ट्रवादीला बारामती, शिरुर, रायगड आणि परभणी या जागा मिळतील हे जवळपास स्पष्ट आहे. बारामतीत सुनेत्रा पवार, रायगडमध्ये सुनील तटकरे, परभणीत राजेश विटेकर ही नावे पक्की मानली जातात.