दक्षिण मुंबईतील चुरशीच्या लढतीत अमराठी टक्का निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 02:54 AM2019-04-29T02:54:32+5:302019-04-29T02:55:25+5:30
उद्योगपतींच्या आवाहनाची चर्चा : व्यापाऱ्यांतील अस्वस्थता ठरणार महत्त्वाची
शेफाली परब-पंडित
अमराठी टक्का प्रभावी असलेल्या दक्षिण मुंबईत गेल्यावेळी मोदी लाटेत मराठी चेहऱ्याला संधी मिळाली. काँग्रेसचे मातब्बर नेते व दोनवेळा निवडून आलेले मिलिंद देवरा यांना हादरा देत शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी झाले. यंदाही सावंत विरुद्ध देवरा असाच सामना रंगला आहे. परंतु, यावेळी कोणतीही लाट नसल्याने शिवसेनेसाठी ही लढत जिकीरीची ठरत गेली. मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्षपद देवरा यांच्याकडे असल्यामुळे काँग्रेससाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा ठरला आहे.
वस्तुत: हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्लाच. तरीही येथील प्रत्येक लोकसभा निवडणूक चुरशीची झाल्याचे दिसून येते. गुजराती, मारवाडी, जैन या पारंपरिक मतदारांमुळे भाजपने अनेकवेळा काँग्रेसला टक्कर दिली. १९९६ आणि १९९९ मध्ये विजयही मिळवला. यंदा पुन्हा भाजपशी युती झाल्यामुळे शिवसेनेला या मतदारसंघात बळ मिळाले. परंतु पराभवाचे उट्टे काढण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली. पण त्यात सुरूवातीला युतीतील भांडणांमुळे भाजपच्या मतदारांनाच लक्ष्य करण्यात आले. त्यातूनच जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजविल्याचा आरोप, शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार, देवरा यांच्यावर गुन्हा दाखल होणे, शिवसेनेची जैन धर्मगुरुंकडे धाव अशा अनेक परस्परविरोधी घडामोडीमुळे येथील प्रचार रंगला.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि गेल्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणारे मुकेश अंबानी, तसेच कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी देवरा यांना जाहीर पाठिंबा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. या पाठिंब्यामुळे गुजराती, मारवाडी, जैन मतदारांत वेगळा संदेश जाऊ शकतो. देशातील मोठ्या हिरे व्यापाऱ्यांबरोबरची खास बैठकही लक्षवेधी ठरली. नोटाबंदी, जीएसटी यामुळे येथील व्यापाºयांत नाराजी आहे. याचा फायदा काँग्रेसने उठवण्याचा प्रयत्न केल्याने शिवसेनाच नव्हे तर भाजपच्या गोटातही अस्वस्थता पसरली.
कुलाब्यापासून शिवडीपर्यंतच्या या मतदारसंघात शिवसेना-भाजपचे २८ नगरसेवक आहेत. शिवडी, वरळी हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परंतु, मनसेने काँग्रेसला दिलेला पाठिंबा आणि राज ठाकरे यांच्या वादळी सभांमुळे या ठिकाणी मराठी मतांचे विभाजन गृहीत धरले गेले. त्यामुळे शिवसेनेत यंदा अमराठी मतांसाठी धावपळ दिसून आली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेने मलबार हिल, मुंबादेवी येथे प्रचारावर भर दिला.
चिराबाजार, गिरगाव, ग्रँट रोड, ताडदेव, कुंभारवाडा, खेतवाडी, शिवडी, वरळीत सुमारे ४० टक्के मराठी मतदार आहेत. या मतदारांचा कौल मिळावा, यासाठी देवरा यांनी सोशल मीडियावरुन सावंत यांना लक्ष्य केले. देवरा यांचा 'मुंबई का कनेक्शन' आणि सावंत यांचा 'गल्ली से दिल्ली आपला माणूस' हा नारा गाजला.
वंचित बहुजन आघाडीने मुंबईतील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अनीलकुमार चौधरी यांना उमेदवारी देत मतदारापुढे तिसरा पर्याय ठेवला. या भागात दलित व मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने असले तरी प्रचारात वंचित आघाडीचा प्रभाव दिसून आला नाही. याउलट काँग्रेसने रॅली व चौकसभांचा सपाटा लावला. काळाचौकीतील राज ठाकरे यांची सभाही गाजली; तर सावंत यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या. एकंदर चित्र पाहता येथील लढत चुरशीची होणार यात शंका नाही. मात्र अमराठी मतदारांचा कौल मिळवण्यात जो यशस्वी होईल, तोच या उच्चभ्रू मतदासंघाच्या खासदारपदी विराजमान होईल, हे गृहीत आहे.
‘चौकीदार चोर है’ म्हणणारे शिवसेनेचे नेते आता ‘मैं भी चौकीदार’ म्हणू लागले आहेत. त्यांचा संधीसाधूपणा उघड झाला आहे. या दुटप्पी धोरणामुळे येथील मराठी माणसांतही शिवसेनेविषयी प्रचंड चीड आहे. लोकांना स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार हवा आहे. याचे परिणाम निवडणुकीत दिसतील. - मिलिंद देवरा, काँग्रेस
गुजराती, मारवाडी हे भाजपचे पारंपरिक मतदार आहेत. त्यामुळे काँग्रेसने कितीही उड्या मारल्या, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. उलट आम्ही यावेळी मुस्लिम मतेही मिळवू. काँग्रेसने कितीही प्रचार केला, मतदारांना प्रलोभने दाखविली तरी ही बहुभाषक मते आम्हालाच मिळतील. - अरविंद सावंत, शिवसेना
कळीचे मुद्दे
पाचशे चौरस फुटांचे घर देण्याच्या काँग्रेसच्या आश्वासनाचा झोपडपट्ट्यांमध्ये लाभ उठविण्याचा देवरा यांचा प्रयत्न.
मोदींची प्रतिमा, संसदेतील प्रभावी कामगिरी आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करुन देवरा यांना अडचणीत आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न.