बडवे म्हणणाऱ्या भुजबळांना अमोल कोल्हेंनी सांगितली पांडुरंगाची निस्सीम भक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 09:11 PM2023-07-05T21:11:34+5:302023-07-05T21:21:43+5:30

पवार साहेबांनी अनेकांना मोठ-मोठ्या संधी दिल्या. पण आता 'विठ्ठलाच्या सभोवताली बडवे आहेत, ते आम्हाला भेटू देत नाहीत', असे ते सांगत आहेत.

Amol Kolhe taught the Chhagan Bhujbals, who call themselves Badves, the absolute devotion of Panduranga. | बडवे म्हणणाऱ्या भुजबळांना अमोल कोल्हेंनी सांगितली पांडुरंगाची निस्सीम भक्ती

बडवे म्हणणाऱ्या भुजबळांना अमोल कोल्हेंनी सांगितली पांडुरंगाची निस्सीम भक्ती

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आता दोन्ही गटाकडून आज बैठक घेण्यात आली. या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील भाषणात वरिष्ठ नेत्यांनी आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला. वयाचे कारण देत, आता थांबायला पाहिजे, असे म्हणत भूमिका स्पष्ट केली. तत्पूर्वी भाषण करताना मंत्री छगन भुजबळ यांनी नाव न घेता जयंत पाटलांवर टीका केली. तसेच, आजही आमचा विठ्ठल पवारसाहेबच आहेत, पण काही बडव्यांमुळे ही वेळ आल्याचं त्यांनी म्हटलं. आता छगन भुजबळांनाशरद पवारांच्या गटातील नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलंय.  

पवार साहेबांनी अनेकांना मोठ-मोठ्या संधी दिल्या. पण आता 'विठ्ठलाच्या सभोवताली बडवे आहेत, ते आम्हाला भेटू देत नाहीत', असे ते सांगत आहेत. बडवे जर आडवे येत होते, तर शिवाजी महाराजांच्या साक्षीने शिवतिर्थावर आपण लाखो लोकांच्या साथीने उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात शपथ घेतली, तेव्हा बडवे आडवे नाही आले. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मला दोन लोकांची नावे विचारली होती. शरद पवार यांनी पहिले नाव छगन भुजबळ यांचे घेतले. तेव्हा बडवे आडवे नाही आले?, अशा शब्दात जयंत पाटील यांनी छगन भुजबळांचा समाचार घेत निशाणा साधला. तर, खासदार अमोल कोल्हे यांनीही विठ्ठलाची निस्सीम भक्ती काय असते हे आपल्या भाषणातून सांगत पलटवार केला. 

आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, असं ते म्हणतात. फार सोप आजकाल ते वाक्य झालंय. पण, मला वाटतं या महाभागांना पंढरीचा पांडुरंगच समजला नाही. त्या पांडुरंगाने कधी मंदिरात या असंही सांगितलं नाही. कांदा मुळा-भाजी, अवघी विठाई माझी म्हणणारे संत सावता माळींच्या ह्रदयात पांडुरंग होता आणि संत गोरा कुंभारच्या कामात पांडुरंग होता. मनातून निस्सीम भक्ती केली असती, तर पांडुरंग पावला असता, असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. तसेच, त्यांनी विनाकारण बडव्यांचं कारण देण्याचा प्रयत्न करत संभ्रम निर्माण केला जात असल्याचंही अमोल कोल्हेंनी म्हटलं. 

काय म्हणाले होते छगन भुजबळ

आम्ही तुरुंगात जाऊन आलो, त्यानंतर अनेकांनी आमिष दाखवली. पण तरीही शरद पवारांसोबत आम्ही एकनिष्ठ राहिलो. पण आता हे का झाले. साहेब आमचे विठ्ठल पण या विठ्ठठलाला बडव्यांनी घेरले आहे. त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या. साहेब आम्ही गेलो ते तुमच्या भोवती जे बडवे जमलेत त्यांच्यामुळे आम्ही बाहेर पडलो. तुम्ही आवाज द्या, त्या बडव्यांना बाजूला करा आम्ही पुन्हा यायला तयार आहोत, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. भुजबळ यांनी नाव न घेता जयंत पाटलांवर टीका केली. 
 

Web Title: Amol Kolhe taught the Chhagan Bhujbals, who call themselves Badves, the absolute devotion of Panduranga.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.