'राज'सभेवर आ. मिटकरींची बोचरी टीका, 'घासलेट चोर' म्हणत मनसे नेत्याचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 11:09 AM2023-05-07T11:09:22+5:302023-05-07T11:27:28+5:30
शरद पवार यांना खरचं राजीनामा द्यायचा होता, असं मला वाटतं. पण, राजीनामा दिल्यानंतर अजित पवार जे वागलेत
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीत जाहीर सभा पार झाली. कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला अप्रत्यक्षपणे विरोध करत, आपल्या जमिनी न विकण्याचं आवाहन राज यांनी कोकणवासीयांना केलं. येथील सभेत त्यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं. राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता तो संपला. पण, पवारांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार जे वागलेत. ये तू गप्प बस. ये तू शांत बस. माईक हातात घेतला. हे सगळं पवार साहेबांच्या डोळ्यादेखत होत होतं, असे म्हणत राज यांनी अजित पवारांची नक्कल केली. राज यांच्या या टीकेवरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खुर्ची सरदार म्हणत त्यांना लक्ष्य केलं. आता, मिटकरींच्या टीकेला मनसेचे सरचिटणीस गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
शरद पवार यांना खरचं राजीनामा द्यायचा होता, असं मला वाटतं. पण, राजीनामा दिल्यानंतर अजित पवार जे वागलेत. ये तू गप्प बस. ये तू शांत बस. माईक हातात घेतला. हे सगळं पवार साहेबांच्या डोळ्यादेखत होत होतं. तेव्हा शरद पवार यांना असं वाटलं असणार. अरे मी आता राजीनामा दिला. हा माणूस असा वागतोय. खरचं जर दिला तर हा माणूस उद्या मला हे सांगेल. ये तू गप्प बस, अशी नक्कल राज यांनी अजित पवारांची केली. त्यानंतर, अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. आता, त्यावर पलटवार करत गजानन काळे यांनी अमोल मिटकरींना घासलेट चोर म्हटलंय. मनसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून येतं.
या तीनपाट,बाजारूचा दादा मुख्यमंत्री पदासाठी रोज भाजपाकडे जावून डोके टेकवून येतोय आणि हा राजसाहेब यांच्यावर सुपारी घेतल्याचा आरोप करतोय ..तिकडे पवारसाहेबांनी यावेळी पण दादाचा सूर्यास्त करून पळता भुई थोडी केली आहे 😆.. कशाला फुकाच्या गप्पा मारतोस..तो चोमडा राऊत रोज दादाचे वस्त्रहरण… https://t.co/jcgOkVWZxd
— Gajanan Kale (@MeGajananKale) May 7, 2023
रिकाम्या खुर्चीच्या सरदाराने भाजपची सुपारी घेऊन आज दादांची मिमिक्री केली म्हणे. अमावस्या पौर्णिमेला उगवणाऱ्या लिटिल स्टारनी उगाच सुर्याच्या नादाला लागून आपले हसे करून घेऊ नये. "आमच्या नेत्याने "एक मिनिट" म्हटलं तरी पळता भुई थोडी होईल, अशी टीका मिटकरी यांनी केली होती. त्यावर, गजानन काळे यांनी पलटवार केलाय.
या तीनपाट,बाजारूचा दादा मुख्यमंत्री पदासाठी रोज भाजपाकडे जावून डोके टेकवून येतोय आणि हा राजसाहेब यांच्यावर सुपारी घेतल्याचा आरोप करतोय. तिकडे पवारसाहेबांनी यावेळी पण दादाचा सूर्यास्त करून पळता भुई थोडी केली आहे. कशाला फुकाच्या गप्पा मारतोस.. तो चोमडा राऊत रोज दादाचे वस्त्रहरण करतोय पण त्यावर हा 'घासलेट चोर' ब्र पण काढत नाही आहे. दादा बिचारे राष्ट्रवादीत एकटे पडले आहेत, या घासलेट चोराने त्यांचे सांत्वन करायला जावे एक मिनिटासाठी तरी .. असा पलटवार मनसेच्या काळे यांनी केलाय.
दरम्यान, रत्नागिरीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे शनिवारी (६ मे) झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी कोकण विकासाच्या मुद्द्यावरून सध्याच्या आणि आधीच्या सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. पर्यटन, कोकणातील गडकिल्ले, कोकणात येणारे उद्योग आणि त्याच्या जमिनींच्या व्यवहारातील घोटाळा या साऱ्यांवर राज यांनी आपल्या ‘ठाकरी’ शैलीत सणसणीत प्रहार केले. तसेच, पक्ष नसलेला अध्यक्ष म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तर, राजीनामा नाट्यावरुन शरद पवार आणि अजित पवार यांनाही लक्ष्य केलं.