इनसाईट स्टोरी, ...आणि रविवारी पुन्हा तापले राज्याचे राजकारण
By दीपक भातुसे | Published: July 17, 2023 06:57 AM2023-07-17T06:57:04+5:302023-07-17T06:57:40+5:30
अजित पवारांच्या भेटीने चर्चांना उधाण
दीपक भातुसे
मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करण्याचा मुहूर्त निवडला होता, तो रविवारच होता. त्यानंतर मध्ये एक रविवार शांत गेल्यानंतर पुन्हा या रविवारी राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला. आता पुन्हा राजकारणात मोठी घडामोड घडते आहे, असे वाटत असतानाच संध्याकाळपर्यंत हे वादळ शांत झाले.
सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. त्यापूर्वी अजित पवार गटाच्या सर्व मंत्री आणि नेत्यांची देवगिरी बंगल्यावर बैठक होती. या बैठकीत एकदा शरद पवारांना भेटून आपल्याबरोबर येण्याची विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला; पण शरद पवारांना न कळवता थेट जाऊन त्यांची भेट घ्यायची आणि त्यांचे पाय धरायचे ठरले. रविवार असल्याने शरद पवार आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी असतील, अशी या सगळ्यांची समजूत होती. त्यामुळे हे सगळे नेते सिल्व्हर ओकवर पोहोचले. तिथे गेल्यानंतर समजले शरद पवार बैठकांसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरवर गेले आहेत. तेव्हा या नेत्यांनी आपला मोर्चा सिल्व्हर ओकवरून यशवंतराव चव्हाण सेंटरकडे वळवला. तोपर्यंत अजित पवार यांच्यासह हे नेते भेटायला घरी आल्याचा निरोप शरद पवारांपर्यंत पोहोचला होता.
शरद पवारांच्या भूमिकेबाबत काही संभ्रम नाही, त्यांच्या भूमिकेत बदल नाही. शरद पवार पुरोगामी विचारांच्या भूमिकेवर ७० वर्ष ठाम आहेत. ते आशीर्वाद घ्यायला आले.
- जितेंद्र आव्हाड, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
कल्पना न देता भेट
कोणतीही कल्पना न देता अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह हे सगळे नेते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दाखल झाले आणि थेट पाचव्या मजल्यावर शरद पवारांच्या दालनात पोहोचले. त्यावेळी तिथे शरद पवार आणि सुप्रिया सुळे होत्या. तिथे अजित पवार गटाचे काही नेते पवारांच्या पाया पडले आणि काही नेत्यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. शरद पवारांनी आपल्यासोबत यावे, अशी विनंतीही केली.
...आणि पाटील निघाले
अजित गटाचे नेते पोहोचले, त्यावेळी विरोधी पक्षांची बैठक विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या दालनात सुरू होती. तेव्हा जयंत पाटील यांना अचानक सुप्रिया सुळेंचा फोन आला आणि शरद पवारांनी तातडीने बोलवले आहे, असा निरोप आला. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड बैठक सोडून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे पोहोचले. तोपर्यंत अजित पवार गटाचे नेते शरद पवारांशी चर्चा करत होते.