मुंबईत काँग्रेसला अजून एक धक्का, कृपाशंकर सिंह यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 06:45 PM2019-09-10T18:45:24+5:302019-09-10T18:46:44+5:30
विधानसभा निवडणूक अवघ्या महिनाभरावर आली असताना काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही आहे.
मुंबई - विधानसभा निवडणूक अवघ्या महिनाभरावर आली असताना काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज उर्मिला मातोंडकर यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई प्रदेश काँग्रेसला अजून एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मुंबईतील वजनदार उत्तर भारतीय नेते कृपाशंकर सिंह यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता ते बुधवारी भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
एकेकाळी मुंबई काँग्रेसवर वर्चस्व राखणारे कृपाशंकर सिंह गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या संपर्कात होते. दरम्यान, आज त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सुपूर्द केला.
Congress leader Kripashankar Singh resigns from the party. He submitted his resignation to Congress Maharashtra in-charge Mallikarjun Kharge in Delhi, today. pic.twitter.com/HUMR8BSzSZ
— ANI (@ANI) September 10, 2019
तत्पूर्वी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी आज सकाळी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले होते. काँग्रेसचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना दिलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई न झाल्याने काँग्रेसला रामराम करत असल्याचे मातोंडकर यांनी सांगितले.
उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम केलं नाही. या कार्यकर्त्यांची तक्रार मी मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडे केली होती. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याउलट त्यांनाच पदं देण्यात आली नाही, अशा शब्दांमध्ये मातोंडकर यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.